महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी (23 फेब्रुवारी) पहाटे 3 वाजून 2 मिनिटांनी निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. मनोहर जोशी यांना 21 फेब्रुवारी रोजी अस्वस्थ वाटत होते. त्यानंतर त्यांना तातडीने मुंबईतील हिंदुजा रुग्णालय दाखल करण्यात आले होते. हृद्यविकाराचा झटका आल्याने त्यांना अस्वस्थ वाटत असल्याचे निदान झाले. त्यानंतर मनोहर जोशी यांना अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले होते.त्यांच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान, शुक्रवारी (23 फेब्रुवारी) पहाटे 3.02 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, मनोहर जोशी यांचं पार्थिव सकाळी नऊ वाजता रुग्णालयातून घरी नेण्यात येणार आहे.त्यानंतर सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मनोहर जोशी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या पश्चिम माटुंगा येथील रूपारेल कॉलेज जवळील W54 निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे.दुपारी 2 वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. दादर येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.