टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. बुधवारी रात्री अकराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले होते. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास त्यांचे पार्थिव रुग्णालयातून कुलाबाच्या घरी नेण्यात आले. टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. देशासह जगभरातून सामान्यांपासून ते विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न द्यावा, अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे. त्यात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून याबाबत आपले रोखठोक मत मांडले आहे.
राज ठाकरे यांचे पत्र :
प्रति, आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी,
सस्नेह जय महाराष्ट्र,
ज्येष्ठ उद्योगपती आणि गेल्या ३ दशकांत भारतीय उद्योगजगताला आकार देणारे रतन टाटा यांचं निधन झालं. रतन टाटांना तुम्ही पण जवळून ओळखायचात, आणि त्यातून तुमच्याही लक्षात आलं असेल की, कुठल्याही मानसन्मानाची अपेक्षा न ठेवणारी व्यक्ती होती. पण भारतीय उद्योगजगाला, भारतीय अर्थव्यवस्थेला त्यांनी दिलेलं योगदान आणि त्याहून महत्वाचं माणूस म्हणून जे त्यांचं मोठेपण आहे, ते अफाट होतं. अशा व्यक्तीला खरंतर ते हयात असतानाच ‘भारतरत्न’सारख्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करायला हवं होतं. पण आता किमान त्यांना मरणोत्तर भारतरत्न घोषित व्हायला हवी अशी माझी आणि माझ्या पक्षाची इच्छा आणि अपेक्षा आहे. तसेच तमाम भारतीयांची देखील याहून काही वेगळी अपेक्षा असेल असं मला वाटत नाही!
काल रतन टाटांच्या निधनाची बातमी बाहेर आल्यावर अनेक ठिकाणचे कार्यक्रम लोकांनी स्वतःहून थांबवून श्रद्धांजली वाहिली, मुंबईत तर काही ठिकाणी दांडिया देखील अर्ध्यावर थांबवून लोक २ मिनिटं स्तब्ध उभे राहिले! आज सकाळपासून सोशल मीडियावर तमाम भारतीय उस्फूर्तपणे श्रद्धांजली वाहत आहेत, आणि प्रत्येकाच्या मनातील भाव असा आहे की आपल्या अगदी घरातील कोणीतरी व्यक्ती गेली आहे. अशा व्यक्ती या ‘भारतरत्न’च नाहीत तर काय मग अजून ? त्यामुळे याबाबतीत तुम्ही संबंधितांना निर्देश देऊन यावर काही निर्णय घ्याल याची मला खात्री आहे.
तसेच भारत हा रत्नांची खाण आहे. पण या रत्नांचा सन्मान कुठल्याही नागरी सन्मानाने करताना तो त्या व्यक्तीच्या आयुष्याच्या योग्य टप्प्यावर व्हावा. मुळात कोणाला मरणोत्तर सन्मान घोषित करायची वेळच येऊ नये. त्या व्यक्तीचा सन्मान ती व्यक्ती हयात असताना आणि शारीरिक दृष्ट्या उत्तम अवस्थेत असताना झालेला कधीही चांगला. आपण अनेकदा बघतो की एखाद्या व्यक्तीचा सन्मान ती व्यक्ती शारीरिक जर्जर अवस्थेत असताना होतो, हे योग्य नाही. या विषयी काही निश्चित धोरण आपण आखाल याची मला खात्री आहे.
-राज ठाकरे