kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

महायुतीमधील तिढा सुटला ; दोन मोठ्या घोषणा आज झाल्या

राज्यात आणि देशात लोकसभेच्या निवडणुकांचे वादळ दिसून येत आहे. सर्वत्र निवडणुकीचे वातावरण आहे. अशातच महाराष्ट्रामधून मोठी बातमी समोर येत आहे. महायुतीकडून आज व मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. महायुतीमधील दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचा तिढा अखेर सुटला आहे. तर, मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून अखेर महायुतीकडून उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

शिवसेनेकडून दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दक्षिण मुंबई हा मुंबईतला महत्त्वाचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघावर भाजपचा देखील दावा होता. भाजपकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. त्यामुळे शिवसेनेला हा मतदारसंघ सुटतो की नाही? अशी चर्चा रादकीय वर्तुळात सुरु होती. अखेर शिवसेनेच्या यामिनी जाधव यांना दक्षिण मुंबईतून उमेदवारी जाहीर झाली आहे. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून अखेर महायुतीकडून उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाने उमेदवारच नाव जाहीर केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याला एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी दिली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ते भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार असतील.

रवींद्र वायकर यांचा सामना महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांच्याशी होणार आहे. अमोल किर्तीकर हे गजानन किर्तीकर यांचे पुत्र आहेत. गजानन किर्तीकर हे शिवसेना शिंदे गटात आहेत. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघासाठी संजय निरुपम यांचं नाव महायुतीकडून चर्चेत होतं. महायुतीसोबत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रवींद्र वायकर आणि संजय निरुपम या दोघांच्या उमेदवारीला जोरदार विरोध केला होता. तर दक्षिण मुंबईत ठाकरे गटाकडून अरविंद सावंत यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. अरविंद सावंत यांच्याकडून प्रचारालादेखील सुरुवात झाली आहे. तर महायुतीत दक्षिण मुंबईचा तिढा काही केल्या सुटत नव्हता. भाजप आणि शिवसेना यांच्यात या मतदारसंघासाठी रस्सीखेच सुरु होती. अखेर या मतदारसंघाचा तिढा आज सुटला आहे. यामिनी जाधव यांच्या नावाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. पण भाजप नेत्यांची नावे देखील चर्चेत होती. त्यामुळे तिढा वाढताना दिसत होता. अखेर हा तिढा आज सुटला आहे.