Breaking News

केंद्रीय निवडणूक आगोयाचे उद्धव ठाकरेंवर कारवाईचे आदेश, संजय राऊत म्हणाले….

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. उद्धव ठाकरे यांनी 20 मे ला मतदानाच्या दिवशी घेतलेली पत्रकार परिषद वादात सापडली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचे आदेश दिल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “निवडणूक आयोगाला 17 पत्र पाठवलेले आहेत. काही सूचना आहेत, काही तक्रारी आहेत. निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतली असं मला दिसत नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपला मतदान करा, रामलल्लांचं फुकट दर्शन देऊ, असं आवाहन केलं. याबाबतचं अत्यंत महत्त्वाचं पत्र आम्ही पाठवलं. त्यावर साधी पोचपावतीदेखील नाही. एकूण 17 पत्र आमच्याकडे आहेत, जे आम्ही निवडणूक आयोगाला पाठवली आहेत”, असं संजय राऊत म्हणाले.

“महाराष्ट्रात सरकारी यंत्रणेचा कसा गैरवापर सुरु आहे, याबाबत त्या पत्रात तक्रार केली आहे. आम्ही पैशाच्या वाटपासंदर्भात काही माहिती पाठवली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, भाजपचे काही नेते असतील, पण ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 20 मे च्या पत्रकार परिषदेसंदर्भात भाजपचे पदाधिकारी पत्र पाठवतात, त्या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोग किती कर्तव्यतप्त, कारवाईचे आदेश दिले. आम्ही या कारवाईचे स्वागत करतो. पण 4 जूननंतर हा निवडणूक आयोग जी भाजपची शाखा आहे, ती स्वतंत्र आणि निष्पक्ष नाही. घटनेला अनुसरुन काम करत नाही. या सर्व गोष्टींचा त्यांना उद्या संध्याकाळपर्यंत जाब द्यावा लागेल”, असा इशारा संजय राऊतांनी दिला.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी परवा ध्यानाला बसले. तो प्रचार नव्हता का? नरेंद्र मोदी 30 तारखेला 10 कॅमेरे लावून ध्यानस्त बसले, सर्व वृत्तवाहिन्या 24 तास नरेंद्र मोदींचा हा मुकप्रचार दाखवत होते. ती सुद्धा एक मुकपत्रकार परिषदच होती. त्यावर निवडणूक आयोगाने डोळे उघडले नाहीत. निवडणूक आयोग ध्यानस्त बसलं होतं? तपस्येला बसलं होतं? मुकदर्शक बनलं होतं? ठीक आहे. काय कारवाई होते ते बघू. आम्हाला अजून 24 तासांचा अवधी आहे. उद्या दुपारनंतर स्पष्ट होईल की, कोण कुणवार कारवाई करतं”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

“महाराष्ट्रातील 12 जिल्ह्याधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्र्यांनी फोन केला, असा दावा संजय राऊत यांनी केलाय. मी आज सकाळी या विषयावर बात केली आहे. ही खूप गंभीर बाब आहे. निवडणूक आयोग आमच्याकडे पुरावा मागत आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश हे जबाबदार नेते आहेत. ते माहिती असल्याशिवाय बोलणार नाहीत”, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली.