राज्यातील राजकीय परिस्थिती लक्षात घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शुक्रवारी नव्या नियुक्त्या जाहीर केल्या. मुंबईत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी ऍड. अमोल मातेले यांची नियुक्ती करण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सायंकाळी उशिराने जाहीर करण्यात आले.
ऍड. अमोल मातेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते म्हणूनही जबाबदारी सांभाळतात.ऍड. अमोल मातेले यांनी दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात उपस्थित राहून पदभार स्विकारला. राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. धीरज शर्मा यांच्या हस्ते ऍड. अमोल मातेले यांची मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती केली गेली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई अध्यक्षा श्रीमती राखी जाधव, माजी आमदार श्री.मिलिंद अण्णा कांबळे, जिल्हा अध्यक्ष श्री.रुपेश खामकर आदी मान्यवर उपस्थित होते.
ऍड. अमोल मातेले यांनी आपण कोणत्याही परिस्थितीत पक्षाचे सर्वेसर्वा आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार यांच्याशी शेवटच्या श्वासापर्यंत एकनिष्ठ राहू, असे भावनिक उदगार काढले. सध्या राज्यातील राजकीय उलथापालथ पाहता पक्षांतर करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सुळसुळाट वाढला आहे असे सांगत युवा पिढीला राजकीय वाटचालीत आपण मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले. आमच्यासाठी पक्षसंघटन महत्वाचे आहे, असेही ऍड. मातेले यांनी नमूद केले.
मी वयाच्या चौदाव्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता झालो. पक्षाच्या स्थापनेपासून मी माझ्या गुरुवर्यांसोबत आहे. ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या राजकीय कारकिर्दीचा माझ्यावर बालपणापासूनच प्रभाव होता. त्यामुळे विद्यार्थी संघटनेतून मी सामाजिक लढा सुरु केला. मुंबई विद्यापीठात ऑनलाईन पेपर तपासणीत झालेल्या गोंधळात विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी असो वा वसतिगृह किंवा स्कॉलरशिपचे प्रश्न सोडवण्याची मला राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष म्हणून संधी मिळाली. या कामगिरीमुळेच मला गुरुवर्यांनी प्रवक्ते पदही बहाल केले. आता मुंबई युवक काँग्रेस अध्यक्ष म्हणून मी युवकांचे शैक्षणिक आणि सामाजिक प्रश्न मार्गी लावणार, असे आश्वासन ऍड. अमोल मातेले यांनी दिले.
ऍड. मातेले यांना शुभेच्छा देण्यासाठी मुंबई विमानतळावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रात्री तीन वाजता गर्दी केली होती. एवढ्या मोठया संख्येने रात्री कार्यकर्ते मुंबई विमानतळावर जमा झाले म्हणून ऍड. अमोल मातेले यांनी त्यांचे धन्यवाद मानले. कार्यकर्त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास निश्चितच सार्थकी लावू, असा विश्वास ऍड. मातेले यांनी व्यक्त केला.