kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

पराभवानंतर राज ठाकरेंनी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली असून नवे आदेश दिले ; राज ठाकरेंची रणनिती काय?

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अत्यंत लाजिरवाणा पराभव झाला. विधानसभेच्या मैदानात मनसेने 127 उमेदवार उतरवले होते, यापैकी एकाचाही विजय झाला नाही. या दारुण पराभवानंतर मनसे पक्षाचे अधिकृत चिन्हही गमावण्याची भिती निर्माण झाली आहे. या पराभवानंतर राज ठाकरेंनी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली असून नवे आदेश दिले आहेत.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने अभूतपूर्व असे यश संपादन केले. निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीसह इतर घटक पक्षांचा धुव्वा उडवला. या धक्कादायक निकालानंतर विरोधक ईव्हीएम मशिनबाबत शंका उपस्थित करत आहेत. मनसेच्या पराभूत उमेदवारांनीही हाच संशय व्यक्त करत निवडणुकीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. यावरुनच आता राज ठाकरेंनीही आक्रमक भूमिका घेतली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात मनसेच्या पराभूत उमेदवारांची बैठक घेतली. राज ठाकरे यांनी उमेदवारांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी पराभूत उमदेवारांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला. निवडणुकीत कोणते फॅक्टर महत्त्वाचे ठरले यावरही बैठकीत चर्चा झाली.राज ठाकरे यांनी सर्वांची मते ऐकून घेतली. तसेच ईव्हीएमबाबत पुरावे गोळा करण्याच्या सूचना उमेदवारांना दिल्या.या सर्व घडामोडींवर राज ठाकरे लवकरच आपली भूमिका मांडणार आहेत.

एकीकडे महाविकास आघाडीमधील नेतेही ईव्हीएम विरोधात आवाज उठवत आहेत. काँग्रेस हायकमांडने या निकालानंतर मोठी घोषणा केली आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेप्रमाणेच ईव्हीएम विरोधातही मोठे आंदोलन उभे करणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. अशातच राज ठाकरे यांनीही मनसैनिकांना ईव्हीएम विरोधात पुरावे गोळा करण्याचे आदेश दिल्याने आगामी काळात मनसेही ईव्हीएमविरोधात मोठे आंदोलन उभे करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.