महायुतीच्या सर्व नेत्यांच्या साक्षीने ४५ + जागा घेऊनच राज्यामध्ये महायुती जागा जिंकेल असा निर्धार व्यक्त करतानाच आज गतीमान महायुती सरकारच्या माध्यमातून जे काम होत आहे त्यामुळे नक्कीच महायुतीला यश मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांनी महायुतीच्या विराट सभेत व्यक्त केला.
रायगड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी महायुतीच्या विराट जाहीर सभेतून सुनिल तटकरे यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
१८ व्या लोकसभेची निवडणूक ही जगाच्या पाठीवरचे देशाचे स्थान बळकट करणारी निवडणूक असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये वेगवेगळ्या योजना आणि महत्त्वाची काम होत असल्याचे सुनिल तटकरे यांनी अभिमानाने सांगितले.
अनंत गीते यांच्यामागे शिवसेना या चार अक्षरांची ताकद नसती तर त्यांचा निकाल तेव्हाच लागला असता. नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात पाच वर्षे आपल्याला काम करण्याची संधी मिळाली. मात्र आपण गीते यांचे एक काम दाखवा आणि बक्षीस घेऊन जा. एका गोष्टीचे वाईट वाटते, पत्रकार मित्रांनी गीतेंना प्रश्न विचारला ; कोरोना, चक्रीवादळ या संकटात तुम्ही कुठे होता? त्यावेळी ते हसत होते. नैसर्गिक आपत्तीला हसणारा लोकप्रतिनिधी असतो, हे माझ्या राजकीय जीवनात पहिल्यांदा पाहायला मिळाले अशी खंत सुनिल तटकरे यांनी व्यक्त केली.
निवडून आल्यावर मी येणारी पाच वर्षे महायुतीचा खासदार म्हणूनच काम करणार आहे. केंद्र सरकारच्या विविध योजना अनेक वर्षे या मतदारसंघांमध्ये येण्याची वाट पाहत होत्या, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात तिसऱ्यांदा महायुती सत्तेत आल्यानंतर त्या आणण्यासाठी मी वचनबद्ध असल्याचा शब्द यावेळी सुनिल तटकरे यांनी दिला.
काही वेळेला समाजात धर्माच्या नावाने संभ्रम निर्माण केला जातो. येणाऱ्या निवडणुकीमध्ये किरकोळ नाही तर मागच्यापेक्षा मोठ्या फरकाने आपल्याला यश मिळेल. पुढची पाच वर्षे जनतेची सेवा करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगत येणाऱ्या दिनांक ७ मे रोजी न चुकता घड्याळावर बटन दाबा आणि प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन सुनिल तटकरे यांनी यावेळी केले.
ही निवडणूक देशाच्या हिताची आहे दिनांक ७ मे रोजी होणारी निवडणूक लोकांच्या मनावर बिंबवण्याची गरज आहे. सुनील तटकरे यांना होणारे मतदान डायरेक्ट मोदींना होणार आहे त्यामुळे आपण सर्वजण ही लढाई लढायची आहे त्यासाठी कटिबद्ध राहुया असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले.
देशात सुराज्य आणायचे असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्याची गरज आहे आणि त्यांचे हात बळकट करण्यासाठी सुनिल तटकरे यांना विजयी करण्याचे आवाहन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले.
नरेंद्र मोदी यांना तिसर्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला महायुतीचा उमेदवार निवडून आणण्याची शपथ घ्यायची आहे. सुमारे ४०६ कोटी रुपयांची वैद्यकीय महाविद्यालयासाठी तरतूद करुन एक हजार कोटीचे वैद्यकीय नगरी अलिबागमध्ये उभी करणार आहोत असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.
महाड विधानसभा मतदारसंघातून ४० हजार पार मताधिक्य देणार असल्याची घोषणा आमदार भरत गोगावले यांनी यावेळी केली.
या जाहीर सभेत आमदार महेंद्र दळवी, माजी आमदार विनय नातू, भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, आमदार योगेश कदम यांनी आपले विचार मांडले.
खासदार सुनिल तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी महायुतीची विराट सभा अलिबाग येथे पार पडली.या विराट सभेनंतर खासदार सुनिल तटकरे यांनी उमेदवारी अर्ज महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत दाखल केला.
महायुतीच्या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनिल तटकरे, उद्योग मंत्री आणि रायगड जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार शेखर निकम, आमदार योगेश कदम, आमदार प्रशांत ठाकूर, माजी मंत्री आमदार रवींद्र पाटील, माजी आमदार विनय नातू, आमदार महेंद्र थोरवे, आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार सुर्यकांत दळवी, भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, किरण सामंत आदींसह महायुतीचे जिल्हाप्रमुख, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, तालुकाप्रमुख आणि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.