महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांना भावनिक साद घातली आहे.महाराष्ट्रातील आजवरच्या वीस मुख्यमंत्र्यांपैकी मी एकमेव मुख्यमंत्री आहे, ज्याचे मुंबईत स्वतःचे घर नाही. मी कधीही स्वत:चे घर भरण्याचा विचार केला नाही. कधीही स्वतःचे उद्योग, व्यवसाय, शिक्षण संस्था उभारल्या नाहीत, असे फडणवीस म्हणाले. फडणवीस हे त्यांचे मूळ गाव दक्षिण पश्चिम नागपूरमधून निवडणूक लढवत आहेत, जिथे ते २००९ पासून आमदार आहेत.
‘मी २५ वर्षे फक्त समाजासाठी काम केले आहे आणि लोकोपयोगी कामे केली आहेत. मला सांगायला आनंद होत आहे की, महाराष्ट्रातील आजवरच्या वीस मुख्यमंत्र्यांपैकी मी एकमेव असा मुख्यमंत्री आहे की, ज्यांच्याकडे मुंबईत घर नाही. माझ्या मालकीचे नागपुरात घर आहे. मी नागपूरकर असल्याचा मला अभिमान आहे’, असेही फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ ते २०१९ दरम्यान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा कारभार संभाळला आहे. दरम्यान, २०२२ मध्ये महायुतीने आपले सरकार स्थापन केले, तेव्हा शिवसेनेचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली. फडणवीस सध्या मुंबईतील मलबार हिल येथील ‘सागर’ बंगला येथे आपल्या शासकीय निवासस्थानी राहत आहेत.