kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

अंकुश चौधरी प्रथमच झळकणार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत ; वाढदिवसानिमित्ताने ‘पी.एस.आय.अर्जुन’ची घोषणा

मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयकौशल्याने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारा आणि ‘स्टाईल आयकॅान’ म्हणून ओळखला जाणारा महाराष्ट्राचा लोकप्रिय अभिनेता अंकुश चौधरीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चाहत्यांना पहिल्यांदाच एका दमदार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. पोस्टरमध्ये अर्जुनचा करारी आणि धाडसी लूक दिसत असून प्रेक्षकांसाठी हा चित्रपट म्हणजे एक पर्वणी ठरणार आहे. व्हिस्ट्रोमॅक्स सिनेमा, ड्रिमविव्हर एंटरटेनमेंट निर्मित ‘पी.एस.आय.अर्जुन’चे भूषण पटेल दिग्दर्शक आहेत तर विक्रम शंकर आणि ध्रुव दास निर्माते आहेत.

यापूर्वी प्रेक्षकांनी अंकुशला रोमँटिक, ॲक्शन हिरोच्या अंदाजात पाहिले आहे. मात्र या चित्रपटात अंकुश एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. सध्या तरी या चित्रपटात कोण कलाकार झळकणार हे समोर आले नसले तरी लवकरच याबद्दलची माहिती प्रेक्षकांसमोर येईल.

चित्रपटाचे निर्माते विक्रम शंकर म्हणतात, “ या चित्रपटाच्या माध्यमातून मी मराठी सिनेसृष्टीत निर्माता म्हणून पदार्पण करत आहे. यापूर्वी मी विविध भाषेत चित्रपटांची निर्मिती केली आहे. परंतु मला मराठीबद्दल नेहमीच कौतुक राहिले आहे. मुळात मराठी प्रेक्षक जाणकार आहेत. त्यांना वैविध्यपूर्ण विषय आवडतात. हा विषयही खूप वेगळा आहे आणि म्हणूनच मी या चित्रपटाची निवड केली. त्यात अंकुश चौधरीसारखा प्रतिभावान अभिनेता या चित्रपटाला लाभला आहे, त्यामुळे हा एक उत्तम योग जुळून आला आहे. अंकुश मराठीतील एवढा मोठा अभिनेता असूनही त्याचे आम्हाला खूप सहकार्य लाभले. आज आमच्या संपूर्ण टीमकडून ही त्याला वाढदिवसाची भेट.’’