बाबू नाय, बाबू शेठ म्हणत, अस्सल कोळी भाषेचा जलवा दाखवणारा स्टायलिश ‘बाबू’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून ट्रेलर पाहून प्रेक्षकांची ‘बाबू’विषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. यात ‘बाबू’च्या आयुष्यातील प्रेम, शत्रु आणि सूडभावना, जबरदस्त ॲक्शन दिसत आहे. त्याच्या आयुष्यात नेमके काय होते, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना हा चित्रपट पाहावा लागेल.

चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना भावत असतानाच चित्रपटातील गाणीही संगीतप्रेमींच्या पसंतीस उतरत आहेत. विविध मूडची ही गाणी सध्या प्रचंड गाजत आहेत. ‘बाबू’ टायटल सॉन्ग आणि त्याची हूकस्टेप सध्या भलतीच ट्रेंडिंगमध्ये आहे. तर ‘फ्युचर बायको’ हे गाणेही अनेकांना नॉस्टेल्जिक करत आहे. टायटल सॉन्गला मंगेश कांगणे यांनी शब्दबद्ध केले आहे. तर संतोष मुळेकर याचे संगीत लाभलेले हे भन्नाट गाणे नकाश अजीज यांनी गायले आहे. तर ‘फ्युचर बायको’ या गाण्याला क्षितिज पटवर्धन यांचे शब्द लाभले असून ऋषिकेश कामेरकर यांनी संगीतबद्ध केले आहे. अवधूत गुप्ते यांच्या दमदार आवाजाने हे गाणे अधिकच बहारदार बनले आहे. या दोन्ही गाण्यांना सध्या संगीतप्रेमींकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक मयूर शिंदे म्हणतात, ” मराठीत पहिल्यांदाच असा आगरी कोळी भाषेचा झणझणीपणा अनुभवायला मिळणार आहे. ९०च्या दशकातील ही कथा प्रेक्षकांना नोस्टॅल्जिक करणारी आहे तर तरूणाईला जुन्या काळातील प्रेमाचा अंदाज दाखवणारा हा चित्रपट आहे. यात प्रेम, मैत्री, दुरावा, शत्रुत्व, बदला, ॲक्शन अशा सगळ्याच गोष्टी आहेत. चित्रपटातील गाणीही वेगवगेळ्या धाटणीची आहेत, त्यामुळे संगीतप्रेमीही नक्कीच खुश होतील. त्यामुळे ‘बाबू’ हे मनोरंजनाचे हे एक परिपूर्ण पॅकेज आहे.’’

श्री समर्थ कृपा प्रोडक्शन प्रस्तुत ‘बाबू’ या चित्रपटाची निर्मिती सुनीता बाबू भोईर यांनी केली आहे. तर या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा मयूर मधुकर शिंदे यांनी सांभाळली आहे. अंकित मोहन, नेहा महाजन, रुचिरा जाधव, स्मिता तांबे , संजय खापरे, श्रीकांत यादव यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका असून येत्या २ ॲागस्टला ‘बाबू’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.