kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

बालगंधर्व रंगमंदिराचा ५६ वा  वर्धापनदिन : ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान 

मी ७८ वर्षांची आहे पण मी पुढे देखील काम करत राहणार आहे. मला हसत खेळत काम करायला आवडतं. पण प्रेक्षकांनी माझ्या खाष्ठ सासूच्याच भूमिका लक्षात ठेवल्या. तुमच्या प्रमाणे मला देखील दुःख आहे. पण माणसाने आपले दुःख घरात ठेवावे अन् बाहेर मोकळे पणाने काम करावे. तरच तुम्ही आनंदी, उत्साही आणि चिरतरूण राहू शकता, अशा भावना ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी व्यक्त केल्या.       

बालगंधर्व रंगमंदिरांच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्व परिवाराच्या वतीने ३ दिवस भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा आज पार पडला. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या हस्ते ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच नाट्य क्षेत्रातील योगदानांसाठी सुचेता आवचट (संगीत नाटक), राजन मोहाडीकर (लेखन), अमोल जाधव (बालनाट्य), आनंद जोशी (दिग्दर्शन), सोमनाथ शेलार (अभिनेता नाटक विभाग),गौरी रत्नपारखी (युवा लेखक) तर पत्रकारितेतील पुरस्कार अजय कांबळे (डिजिटल मीडिया), चंद्रकांत फुंदे (इलेक्ट्रॉनिक मीडिया), सुवर्णा चव्हाण (प्रिंट मीडिया) यांना प्रदान करण्यात आला. 

यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, सुर्यदत्ता एज्युकेशन फाऊंडेशनचे डॉ. संजय चोरडिया, सिनेअभिनेत्री वर्षा उसगांवकर, प्रिया बेर्डे, सुरेखा कुडची, अलविरा मोशन एंटरटेनमेंट च्या दीपाली कांबळे, तरवडे इन्फ्राचे किशोर तरवडे, सोनू म्युझिकचे सोनू चव्हाण, सांस्कृतिक केंद्र विभाग ,पुणे मनपाचे अधिकारी राजेश कामठे, जेष्ठ गायक इकबाल दरबार, सुप्रिया हेंद्रे, बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आदी उपस्थित होते.

पुरस्काराला उत्तर देताना उषा नाडकर्णी म्हणाल्या, मुंबईतील शिवाजी मंदिर, ठाण्यातील गडकरी रंगायतन आणि पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी जसा नाटकाचं प्रयोग रंगतो तसा कोठेही रंगत नाही. आज पर्यंत अनेक नाटकं, चित्रपट, मालिका केल्या अन् इथून पुढील काळात देखील करत राहणार आहे. आज वरची कारकीर्द ही प्रेक्षकांमुळेच शक्य झाली कारण त्यांनी माझ्या कामावर प्रेम केलं. पण इतकं काम करून देखील आज ही आम्हाला आमचे मानधन / कामाचे पैसे निर्मात्यांकडून वेळेवर येत नाही. ही शोकांतिका आहे. या प्रकारात चित्रपट महामंडळाने लक्ष घालावे, अशी अपेक्षा उषा नाडकर्णी यांनी व्यक्त केली.     

प्रास्ताविक करताना मेघराजराजे भोसले म्हणाले, एखाद्या रंगमंदिराचा वर्धापन दिन साजरा होणारा देशात हा एक वेगळा कार्यक्रम सोहळा आहे. गेली १६ वर्ष आम्ही हा वर्धापन दिन साजरा करत आहे. केवळ पुरस्कार देणे हा या कार्यक्रमांचा उद्देश नसून नवीन कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा देखील या कार्यक्रमांचा उद्देश आहे. या तीन दिवसांच्या काळात भक्तीगीतांपासून व्यावसायिक नाट्य, संगीत रजनी असे असंख्य कार्यक्रम बालगंधर्व परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे.    

संजय चोरडिया म्हणाले, सर्व कलाकारांच एक तीर्थक्षेत्र असावं असे हे बालगंधर्व रंगमंदिर आहे. प्रत्येक कलाकाराला वाटतं की आपला एक तरी प्रयोग किंवा कार्यक्रम या रंगमंदिरात व्हावा. अन् येथे रंग मंचावर आल्यानंतर त्या प्रत्येक कलाकाराच जणू आयुष्यच बदलून जातं. अनेक कलाकारांच्या कारकिर्दीची सुरूवात येथून झाली आहे. त्याला हजारो, लाखो कलाकार साक्षीदार आहेत.

उल्हास पवार म्हणाले, उषा कलबाग ते उषा नाडकर्णी या उषा ताईंच्या जीवनपटात त्यांनी ‘गुरू’ पासून ‘पुरूष’ पर्यंत अनेक मोठ्या नाटकात भूमिका करून नाट्य सृष्टी गाजवली आहे. तसेच हिंदी पासून मराठी चित्रपटात देखील आपली मोहोर उमटवली आहे. अलीकडे शब्दांची स्वस्ताई झाली आहे. राजकारणात तर सम्राट, महर्षी, लोकप्रिय हे शब्द तर साधे झाले आहेत. पण कोणत्याही विशेषणाला चपखल ओळख बसेल उषा नाडकर्णी यांचे व्यक्तिमत्व आहे. यावेळी बोलताना उल्हास पवार यांनी डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या ‘नाट्यकलेची वाटचाल’ या विषयांवरील व्याख्यानाची आठवण देखील सांगितली.     

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चित्रसेन भवार यांनी केले तर आभार पराग चौधरी यांनी मानले.