‘ल्युटन्स जमात’ आणि ‘खान मार्केट गँग’ इतक्या वर्षांपासून गप्प बसल्याचे आश्चर्य वाटते. जनहित याचिकेचे ‘ठेकेदार’ असणाऱ्या आणि वेळोवेळी न्यायालयांमध्ये जाणाऱ्यांना त्यावेळी स्वातंत्र्याची काळजी का नव्हती, असा उपरोधिक सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. दिल्लीत सुरू झालेल्या एनएक्सटी कॉनक्लेव्ह २०२५ चे उद््घाटन करताना ते बोलत होते.

आणखी काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?

  • ब्रिटिशांनी १५० वर्षांपूर्वी ड्रामाटिक परफॉर्मन्स अॅक्ट (नाट्यमय कामगिरी कायदा) केला होता. स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षे हा कायदा अस्तित्वात होता. याचा अर्थ असा की लग्नात १० पेक्षा जास्त लोक नाचत असतील तर पोलिस वर आणि वऱ्हाडींना अटक करू शकत होते. आपल्या सरकारने तो कायदा रद्द केला.
  • त्यावेळच्या सरकारला आणि नेत्यांना काहीही देणेघेणे नाही. असा कायदा आपल्या सरकारने आणला असता तर केवढा गदारोळ झाला असता, अशी कोपरखळीही मोदींनी लगावली. ते म्हणाले, ‘‘मोदींनी असा कायदा आणला असता तर काय झाले असते याचा विचार करा. सोशल मीडियावरील ट्रोलर्सनी असा अपप्रचार केला असता की त्यांनी अक्षरशः आग लावली असती आणि माझे केस उपटले असते. परंतु आमच्या सरकारने वसाहतवादाच्या काळातील हा कायदा रद्द केला. आजच्या काळात पूर्णपणे अप्रासंगिक बनलेले १५०० कायदे केंद्र सरकारने मागील दशकात रद्द केले. यातील बहुतांश कायदे ब्रिटिशकालीन होते.’’
  • या कायद्यांमध्ये बांबू तोडल्याबद्दल लोकांना तुरुंगात टाकणारा एक कायदा देखील होता. आधी बांबू तोडल्याबद्दल लोकांना तुरुंगात टाकले जायचे, कारण या कायद्यानुसार आपल्या देशात बांबूला झाड मानले जात होते. आपल्या आधीच्या सरकारला बांबू हा वृक्ष असल्याचे कळलेच नाही. अखेर आपल्या सरकारने हा कायदा बदलला. बांबू हा ईशान्य भारतातील आदिवासी समुदायांच्या जीवनातील अविभाज्य घटक असताना बांबू तोडल्याबद्दल त्यांना तुरुंगात टाकले जात होते.
  • असे वसाहतकालीन कायदे सरकारने रद्द केले. आता प्राप्तिकर विवरण भरण्याची प्रक्रिया देखील काही मिनिटांत पूर्ण होते आणि काही दिवसांत परतफेड केली जाते, असेही मोदी म्हणाले. यासोबतच, मोदी यांनी कुंभमेळा आणि त्यासाठी झालेल्या तयारीची प्रशंसा केली. ते म्हणाले, की राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे विचार करण्याची संधी मिळत आहे. आता शाळेपासूनच मुले एआय आणि डेटा सायन्ससारख्या क्षेत्रांची तयारी करण्यासाठी कोडिंग शिकत आहेत. या वर्षीच्या अर्थसंकल्पात ५०,००० अटल टिंकरिंग लॅब्स सुरू करण्याची योजना जाहीर केली आहे.

पुरंदर अंजिरांना मागणी

पूर्वी ज्या वस्तू बाहेरून आयात केल्या जात होत्या आता स्थानिक पातळीवर त्यांचे उत्पादन होत असून भारतातून त्यांची निर्यातही केली जात आहे. एकेकाळी स्थानिक बाजारपेठेपुरते मर्यादित असलेले शेतकरी आता त्यांची पिके जागतिक बाजारपेठेत पोचवताना दिसत आहेत, असे सांगताना मोदी म्हणाले की पुलवामाचे हिम वाटाणे, महाराष्ट्रातील पुरंदर येथील अंजीर आणि काश्मीरमध्ये तयार होणारी क्रिकेट बॅट यासारख्या उत्पादनांना जगभरात मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *