आत्ताची मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी नवी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. यावेळी पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, पक्षाचे नेते पवन खेडा, हरियाणा काँग्रेसचे प्रमुख उदय भान आणि हरियाणाचे एआयसीसी प्रभारी दीपक बाबरिया उपस्थित होते.
काँग्रेसच्या सदस्या होताच विनेश फोगट यांनी सांगितले की, “जेव्हा आम्हाला रस्त्यावर ओढले जात होते, तेव्हा काँग्रेस आमच्यासोबत होती.” काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर विनेश फोगट म्हणाल्या की, “जो लढा होता तो संपलेला नाही, आमची केस कोर्टात सुरू आहे. ती लढतही आम्ही जिंकू. ज्याप्रमाणे आम्ही खेळात कधीही हार मानली नाही, त्याचप्रमाणे या नव्या व्यासपीठावर पार्टीमध्येही आम्ही हार मानणार नाही, आम्ही मनापासून मेहनत करू. तुमची बहीण सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील, असे मला सांगायचे आहे.
काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर बजरंग पुनिया म्हणाले, “कठीण काळात आमच्या पाठीशी उभे राहिलेल्या सर्व काँग्रेस नेत्यांचे आम्ही आभार मानतो. भाजप आयटी सेलने सांगितले की, त्यांचे उद्दिष्ट आम्हाला राजकारण करायचे होते, आम्ही भाजपच्या सर्व महिला खासदारांच्या घरी पत्रे पाठवली होती, तरीही त्या महिला खेळाडूंच्या पाठीशी उभ्या राहिल्या नाहीत, आम्ही त्यांना कुस्तीमध्ये जशी साथ दिली, त्याचप्रमाणे आम्ही पक्षात राहून मेहनत करू, पक्ष पुढे नेऊ.
विनेश फोगट यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या दरम्यान भारतीय रेल्वेतील आपल्या पदाचा राजीनामा दिला. विनेश फोगाट भारतीय रेल्वेत ओएसडी स्पोर्ट्स या पदावर होती. विनेशने लिहिले की, ‘भारतीय रेल्वेतील सेवा माझ्या आयुष्यातील एक गौरवशाली टप्पा होता. आयुष्याच्या या वळणावर रेल्वे सेवेतून बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. राजीनामा भारतीय रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे सोपवला आहे, देशाच्या सेवेसाठी भारतीय रेल्वेने दिलेल्या संधीसाठी भारतीय रेल्वे परिवाराची सदैव ऋणी राहीन’ असे विनेशने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.