गेल्या काही दिवसांपासून विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे. अगदी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीपासून ते एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या ५६ टक्के पगारापर्यंत अनेकविध गोष्टींवरून महाविकास आघाडीचे नेते महायुती सरकारवर निशाणा साधत आहेत. यातच ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी एक्सवर एक पोस्ट करून सरकारवर हल्लाबोल केला आहे. सामान्य जनतेसाठी सरकारकडे पैसा नाही, पण मंत्र्यांच्या कामांसाठी तिजोरीतून भरघोस निधी दिला जात आहे, अशा आशयाची तुलनाच आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये आदित्य ठाकरे म्हणतात की, एसटी कर्मचाऱ्यांना ५६ टक्केच पगार दिला जात असल्याचे गेल्या आठवड्यात आपण पाहिले, तसेच महाराष्ट्रातल्या अनेक सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल होणार असे दिसत आहे. सरकारकडे कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी निधी नाही, शेतकरी आत्महत्या वाढल्या असताना शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी निधी नाही, लाडक्या बहीणींना निवडणुकीपूर्वी दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी निधी नाही, आरोग्य व्यवस्था, औषधांचा पुरवठा ह्यासाठी निधी नाही, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.
परंतु, मंत्र्यांच्या पगारासाठी निधी आहे, मंत्र्यांच्या बंगल्यांच्या नूतनीकरणासाठी निधी आहे, उपमुख्यमंत्री कोल्हापुरात म्हणाले, तसे मंत्र्यांच्या ताफ्यातील नवीन गाड्या खरेदीसाठी निधी आहे, लाडक्या कंत्राटदारांसाठी निधी आहे, भव्यदिव्य सोहळ्यांसाठी निधी आहे, जाहिरातींसाठी निधी आहे. नवीन एसटी बसेस घेण्यासाठी, म्हणजेच कंत्राटांसाठी निधी आहे. ह्यातून काय दिसतंय? निवडणूक आयोगाच्या कृपेने निवडून आलेले हे सरकार जनतेचे भले करणारे सरकार नसून, स्वतःचा स्वार्थ साधणारे सरकार आहे!, या शब्दांत आदित्य ठाकरेंनी हल्लाबोल केला.
दरम्यान, जेव्हा महाविकास आघाडी सरकार होते, तेव्हा एसटी कर्मचाऱ्यांना जे लोक रस्त्यावर आणत होते, ते लोक आता शांत का आहेत? ते लोक का सरकारला का विचारणा करत नाहीत? एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत कोण उत्तरे देणार? असे एकामागून एक प्रश्न आदित्य ठाकरेंनी यापूर्वी उपस्थित केले होते.
Leave a Reply