शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या मोफत जेवणावर माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी आक्षेप घेतला होता. शिर्डीतील साईबाबा संस्थानने मोफत जेवण बंद करावं. फुकट जेवणामुळे महाराष्ट्रातील भिकारी येथे गोळा झाले आहेत, हे पैसे मुलांच्या भवितव्यासाठी, शिक्षणासाठी खर्च करावे, अशी मागणी सुजय विखे पाटील यांनी केली होती. मात्र त्यांच्या या विधानावरून आता वातावरण तापलं असून अनेकांनी त्यांच्या या विधानाचा निषेध केलाय. एवढंच काय तर यावरून विखे पाटील पिता-पुत्रांनीही वेगळी भूमिका व्यक्त केली आहे. साईभक्तांना प्रसाद भोजन निःशुल्क सुरूच राहील, असे मंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले. सुजय विखे यांच्या विधानाचे पडसाद आता उमटायला लागले असून ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनीही त्यांना टोला लगावत खडे बोल सुनावलेत.
सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर सुजय विखे पाटील यांना एक जाहीर पत्र लिहून त्यांना त्यांच्या विधानावरून थेट सुनावलं आहे. ‘ सुजयजी, शिर्डीतला अन्नप्रसाद तासन् तास रांगेत उभे राहून भक्तिभावाने ग्रहण केला जातो. हा प्रसाद ग्रहण करणारे फक्त गरिबीरेखेच्या खालचे किंवा मध्यमवर्गीय नाही तर धनाड्य लोकसुद्धा रांगेत उभे राहून मोठ्या श्रद्धेने हा प्रसाद घेतात. मात्र भक्तांनाच भिकारी म्हणणे हा उन्मत्तपणा बरा नव्हे’ असे लिहीत सुषमा अंधारे यांनी सुजय विखेंना खडे बोल सुनावले आहेत.
” श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईंची कीर्ती महती फक्त राज्यात आणि देशात नाही तर जगभरात आहे त्यामुळे जगभरातील साईभक्त शिर्डी मध्ये येतात आणि यथाशक्ती दिलखुलासपणे दानधर्मही करतात. शिर्डीसंस्थानचे वार्षिक उत्पन्न सरासरी 850Cr आहे असे माध्यमांमधून कळते. नवीन वर्ष गुढीपाडवा किंवा गुरुपौर्णिमा या विशेष दिवशी येणारे हे अजून वेगळ्या पद्धतीचे असते. अर्थात साईभक्त अत्यंत सढळ हाताने हे सगळं देतात कारण ” स्नान से तन की शुद्धी होती है ; मंत्र से मन की शुद्धी होती है और दान से धन की शुद्धी होती है” असे मानणारा एक मोठा वर्ग आपल्या भारतीय परंपरेत आहे. आधी साई भक्तांना 10रू कुपन वर मिळणारे भोजन हळूहळू संस्थानाची देणगी वाढल्याने भोजन सेवा मोफत झाली.
सुजयजी, शिर्डीतला अन्नप्रसाद तासन् तास रांगेत उभे राहून भक्तिभावाने ग्रहण केला जातो. हा प्रसाद ग्रहण करणारे फक्त गरिबीरेखेच्या खालचे किंवा मध्यमवर्गीय नाही तर धनाड्य लोकसुद्धा रांगेत उभे राहून मोठ्या श्रद्धेने हा प्रसाद घेतात. मात्र भक्तांनाच भिकारी म्हणणे हा उन्मत्तपणा बरा नव्हे’,अशा शब्दांत सुषमा अंधारे यांनी सुजय विखेंवर टीका केली आहे.
सुजयजी आपण आपल्या विधानाच्या समर्थनात आता घुमजाव करताना हे पैसे शिक्षणासाठी वापरले जावेत असे म्हणत आहात. मात्र सुजयची आपल्या PVP अर्थात पद्मश्री विखे पाटील शिक्षण संस्थेचे , प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, प्रवरा अभियांत्रिकी शिक्षण संस्था sar Visvesvaraya institute of technology, नाशिक, तसेच लोणी अहिल्यानगर नाशिक पुणे संगमनेर अशा विविध ठिकाणी आपण सुरू केलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा बीएसडब्ल्यू एमएसडब्ल्यू मेडिकल इंजीनियरिंग डेंटल आयटीआय फॅशन डिझायनिंग इंटेरियर डिझायनर, डीएमएलटी, डीएड, बीएड, नर्सिंग, यापैकी कोणते युनिट आहे ज्या युनिटमध्ये आपण
मुलांना मोफत शिकवता..?
आपल्या प्रत्येक युनिटमध्ये अगदी चौथी पाचवीच्या मुलांना सुद्धा एक ते दीड लाख रुपये शुल्क आकारले जाते परंतु त्याच निवासी शाळांमधून भोजनालय किंवा सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या लोकांना पाच ते सात हजार रुपयांवर राबवून घेतले जाते तेव्हा आपला हा उदात्त समाजकार्याचा दृष्टिकोन कुठे जातो?
खरंच गरजू गरीब मुलांना शिक्षण मिळावे आणि मोफत मिळावे असे तुम्हाला वाटत असेल तर पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांच्या नावे सुरू असणाऱ्या आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेमार्फत सुरू असणाऱ्या या अनेक युनिट्स मधून मुलांना मोफत शिक्षण देण्यासाठी तुम्हीच पुढाकार का बर घेत नाही ? असा खोचक सवाल सुषमा अंधारे यांनी विचारला.
तुमचा नेमका आक्षेप कशावर आहे ?
सुजायजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी.. तुम्ही सुरू केलेलं हॉस्पिटल सतत गजबजलेलं असावं म्हणून साई संस्थानचे सर्व सुविधांनी सुसज्ज असणाऱ्या रुग्णालयाला आणि तेथील मशीन्स चालवायला ऑपरेटर्स मिळत नाहीत. तुमच्या शाळेला विद्यार्थी मिळावे म्हणून संस्थानने बांधलेली शाळेची इमारत सुसज्ज असताना त्याचे लवकर उद्घाटन होऊ दिले जात नाही.
मंदिराच्या परिसरात छोट्या-मोठ्या फुल विक्रेत्यांवर बंदी आणणारे तुम्ही समाधीवरच्या फुलांची अगरबत्ती इथे मिळेल म्हणून स्वतःच्याच ट्रस्टमार्फत अगरबत्तीचा स्टॉल चालवतता… थोडक्यात काय तर सर्व मार्गांनी सर्व दिशेने संपत्तीचा स्त्रोत हा आपल्याच कडे असला पाहिजे हा तुमचा दुराग्रह नव्हे काय..?
सुजयजी तुमचा नेमका आक्षेप कशावर आहे ? संस्थांमध्ये मोफत भोजन देण्यावर की या सगळ्या व्यवस्थेवर तुम्हाला पूर्णतः नियंत्रण मिळवता येत नाही यावर…? आता तर तुम्ही हद्द केली.. तुम्ही चक्क भक्तांना भिकारी म्हणलात… मग निवडणुकीच्या काळात दारोदार लोकांकडे मत मागणारे तुम्ही तुम्हाला काय म्हणायला हवे..? सुजायजी लवकर बरे व्हा..! हे लिहिताना मी शक्य तेवढे सबुरी राखली आहे. अपेक्षा असेल आपण सुद्धा सबुरीने घ्यावं.. बाबा आपणास सन्मती प्रदान करो ! असा टोलाही सुषमा अंधारे यांनी लगावला.
काय म्हणाले होते सुजय विखे पाटील ?
शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या मोफत जेवणावर माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी आक्षेप घेतला. शिर्डीतील साईबाबा संस्थान भक्तांच्या देणगीतून दररोज पन्नास हजारापेक्षा जास्त लोकांना मोफत भोजन देत आहे. मात्र यामुळे शिर्डीत भिकाऱ्यांची संख्या वाढली आहे. मोफत जेवण बंद करावं आणि मुलांच्या भविष्यासाठी हा पैसा खर्च केला जावा, अशी अपेक्षा सुजय यांनी व्यक्त केली होती.