राज्यात शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक प्रचारादरम्यान महिला अत्याचारासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये पॉर्न फिल्ममधील कलाकार घेतल्याचा दावा भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी करत शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. शिवसेनेच्या जाहिरातीवर चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना ठाकरे गट व आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. महिला अत्याचाराबाबत प्रसिद्ध केलेल्या या जाहिरातीतील कलाकार हा पॉर्न स्टार आहे. उल्लू अॅपमधील वेब सीरिजमध्ये त्याने काम केले असून त्यात महिलांचे लैंगिक शोषण करतो. अशा कलाकाराला घेऊन महिला अत्याचारावर जाहिरात कशी केली,असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. चित्रा वाघ यांच्या आरोपावर शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे आणि खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी जोरदार पलटवार केला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जाहिरातीवर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन टीका केली. त्यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ट्वीट करत चित्रा वाघ यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या, त्यांनी आपल्या पक्षाचा सल्ला घ्यावा. अर्धवट माहिती घेवून बोलायचा प्रयत्न करू नये. आपल्याकडं पॉर्न इंडस्ट्री नाही, चित्राबाई पॉर्न फिल्म जास्त बघत असतील. त्याचबरोबर राजकीय जाहिराती बनवताना प्रोडक्शन हाऊसकडून रेकॉर्ड चेक केलं जातं. भारत सरकारकडून सेन्सॉर होत असतात. माझं यातील ज्ञान कमी आहे, चित्रा वाघ यांचं पॉर्न व्हिडिओ बाबत ज्ञान अगाध असावं किंवा त्या पारंगत असाव्यात.

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विट करत चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे.आक्रस्ताळ्याबाई सवयीप्रमाणे बडबडून गेल्या. पण३००० हून जास्त सेक्स व्हिडिओ व्हायरल झालेल्या प्रज्वल रेवण्णा, किंवा मुलुंडच्या HD व्हिडिओ वाल्याबद्दल त्या अळीमिळी चुपचीळी करून बसल्या. त्यांची काही चूक नाही, सध्या त्या दिल्या भाकरीच्या आणि सांगितल्या चाकरीच्या आहेत, अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे.