शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख दिवगंत आनंद दिघे यांच्या टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमात शिंदेच्या शिवसेनेचे काही पदाधिकारी नोटा उधळतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित पदाधिकाऱ्यांना पक्षातून काढून टाकण्यात येणार असल्याचं ते म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

आनंदआश्रमतील प्रकरणावरून एकनाथ शिंदे म्हणाले, “मी ते पाहिलं. त्याची चौकशी होईल. ज्याने असा प्रकार केलाय त्याला पक्षातून काढून टाकणार. त्याच्यावर कारवाई करणार.”

वैभव नाईक यांची प्रतिक्रिया काय?

आश्रमात पैसे उडविणारे शिवसैनिक बारमध्ये जाणार होते, म्हणूनच त्यांनी त्यापद्धतीप्रमाणे पैसे उधळले, असा आरोप उबाठा गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केली. स्व. आनंद दिघेंनी त्याकाळी बार फोडून सामान्य माणसाला न्याय दिला होता. पण त्याच दिघे साहेबांच्या आश्रमात बारप्रमाणे पैसे उडविले जाणे, हा दिघे साहेबांचाच अवमान आहे, अशीही टीका नाईक यांनी केली.

संजय राऊत काय म्हणाले?

स्व. आनंद दिघेंच्या घरात भिंतीवर एक हंटर लावलेला होता. काल आनंद आश्रमात झालेला धिंगाणा आनंद दिघेंनी पाहिला असता तर भिंतीवरील हंटर काढून त्यांनी लुटीचा पैसा उधळणाऱ्यांना फोडून काढलं असतं. जे स्वतःला आनंद दिघेंचा वारसादार मानतात, त्यांना आम्ही सांगू इच्छितो की, हा आनंद दिघेंचा वारसा नाही. आनंद दिघे अशाप्रकारच्या लोकांचे कधीच समर्थन करत नसत. बारमध्ये ज्या प्रकारे पैसे उधळावेत, त्या पद्धतीने आनंद आश्रमात पैसे उधळले गेले, अशी टीका शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी केली.

या राज्याच्या संस्कृतीला कलंकित करण्याचे काम हे सरकार करत आहे. पण ज्यांना गुरू मानले, त्यांनाही यांनी सोडलेले नाही. गुरूचीही अपकीर्ति यामाध्यमातून केली आहे. आनंद दिघेंना यांनी गुरू मानले असले तरी दिघेंनी यांना आपले शिष्य मानले होते का? बारमध्ये पैसे उधळावेत, अशा प्रकारचे कृत्य आनंद दिघेंच्या आसनासमोर झाले. अशाच प्रकारचा पैशांचा धिंगाणा राज्यभरात सुरू आहे. हा धिंगाणा फक्त लुटीच्या पैशांतूनच केला जाऊ शकतो, कष्टाचा पैसा असा उडवला जात नाही. पैसे उडविणाऱ्यांची चौकशी केली पाहीजे. त्यांच्याकडे एवढा पैसा आला कुठून? याचा शोध घेतला पाहिजे, असं राऊत म्हणाले.

स्वतःला आनंद दिघेंचे चेले म्हणवून घेणाऱ्यांनी यावर भाष्य केले पाहीजे. दिघे साहेब असते तर भिंतीवचा हंटर आज नक्कीच खाली उतरला असता आणि एकेएकाला फोडून काढले असते, अशी टीका संजय राऊत यांनी केली.