तेलंगणामध्ये काँग्रेसने केलेल्या घोषणा सत्ता येताच लागू झाल्या आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, तरुणांना रोजगार, महिलांना मोफत बसप्रवास , शेतकरी आणि गरिबांना मोफत वीज, ५०० रुपयांत सिलेंडर या योजना काँग्रेसने खऱ्या करून दाखवल्या आहेत. काँग्रेसची गॅरंटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखी फसवी गॅरंटी नाही, अशी टीका तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.
काँग्रेस भवन येथे रेवंत रेड्डी यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस अ ॅड. अभय छाजेड, राष्ट्रीय प्रवक्त्या शमा महंमद, शहराध्यक्ष अरविंद शिदे यावेळी उपस्थित होते.
कर्नाटक, तेलंगण आणि हिमाचल प्रदेश येथील काँग्रेस सरकारने गॅरंटी खरी करून दाखवली आहे. तेलंगणात आमचे सरकार आल्यानंतर २५ दिवसात २३ लाख शेतकऱ्यांचे १८ हजार कोटी रुपयांचे कर्जमाफ केले आहे. पन्नास हजार तरुण, तरुणींना नोकरी दिली आहे. गरीब लोकांना हक्काचे घर दिले. महिलांना प्रवासासाठी बस मोफत केली. १ कोटी १० लाख महिला बसने प्रवास करत आहेत. घरगुती सिलेंडर ५०० रुपयांना उपलब्ध करून दिले आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी १५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. शेतकरी आणि गरिबांना २०० युनिटपर्यंत वीज मोफत दिली आहे. शेतकऱ्यांना मुबलक वीज आणि पाणी दिले आहे, अशी माहिती रेड्डी यांनी दिली.
भाजपबाबत ते म्हणाले, भाजपने निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवू, दरवर्षी २ कोटी तरुणांना रोजगार ,
गरिबांना प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे घर अशा घोषणा केल्या. यातील एकही योजना भाजपने व्यवस्थित राबवली नाही. २ कोटी नोकऱ्यांबाबत संसदेत विचारणा झाल्यानंतर ७ लाख तरुणांना नोकरी दिल्याची कबुली सरकारने दिली आहे. हे प्रमाण एक टक्काही नाही. शेतकऱ्यांना हमीभाव नाही. भाजप सरकारमुळे शेतकरी दिल्लीत शहीद झाले.
महाराष्ट्र सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. शेतकरी, गरीब, बेरोजगारांसाठी या सरकारकडे एकही कल्याणकारी योजना नाही, अशी टीका रेड्डी यांनी केली. भाजप सरकारने एक समिती नेमून तेलंगणात पाहणी करण्यासाठी पाठवावे. आम्ही त्यांना तेलंगणमधील योजना दाखवतो. मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना आणि अकरा वर्षांपासून पंतप्रधान असताना त्यांच्याकडे विकासाची एकही यशोगाथा नाही, अशी टीका त्यांनी केली.
महाराष्ट्रातील प्रचार संपल्यानंतर भाजप आणि महायुतीच्या नेत्यांनी तेलंगणमधील काँग्रेसच्या योजना आणि विकास पाहायला यावे, असे आमंत्रण त्यांनी दिले.
मोदी महाराष्ट्रातील प्रचार सोडून परदेशात गेले आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी भाजप देशाला तोडत आहे. विकासाचे मुद्दे नसल्याने
हिंदू- मुस्लिम आणि हिंदू -ख्रिश्चन यांच्यात फूट पाडून धार्मिक ध्रुवीकरण करत आहेत.
महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र भूमी आहे. मात्र , भाजपने महाराष्ट्राला गद्दारांचा अड्डा केला आहे. दोन पक्ष फोडून भाजपने नेत्यांना गुलाम केले आहे.
गुजरातसाठी मुंबई लुटण्याचे काम सुरू आहे. भाजपला पूर्ण महाराष्ट्र अदाणीला द्यायचा आहे. महाराष्ट्र वाचवायचा असेल तर महाविकास आघाडीला निवडून द्या.
दोन माणसे जिंकणार की महाराष्ट्रातील १२ कोटी लोक जिंकणार, हे ठरवणारी ही निवडणूक आहे, असे रेड्डी म्हणाले.