kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

कर्ज फेडायला करावं लागतं बाबा..; अभिनेत्री प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

मराठमोळी अभिनेत्री आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमाची सूत्रसंचालिका प्राजक्ता माळीने नुकताच एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असून त्यावर लिहिलेल्या कॅप्शनने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे. या व्हिडीओमध्ये प्राजक्ता विविध ब्रँड्सच्या जाहिरातींसाठी फोटोशूट करताना दिसून येत आहे. शूटिंगची पडद्यामागची दृश्ये तिने या व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली आहेत. त्याचसोबत या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, ‘कर्ज फेडायला करावं लागत बाबा’.प्राजक्ताने कर्जत याठिकाणी फार्महाऊस घेतला होता. यासाठी तिने भलंमोठं कर्ज घेतल्याचंही म्हटलं होतं. फार्महाऊसचे फोटो पोस्ट करत तिने लिहिलं होतं, ‘स्वप्न साकार. माझ्या स्वप्नातल्या फार्महाऊसची मी मालकीण झाली आहे. डोंगराच्या कुशीत, निसर्गाच्या सानिध्यात घर पाहिजे एवढीच अट होती. अगदी मनासारकं घर मिळालं. खानदानातली सर्वांत सुंदर प्रॉपर्टी, खानदानातल्या सर्वांत मोठ्या कर्जासहीत. फेडू.. फक्त तुमचा आशीर्वाद राहू द्या.’ त्यामुळे फार्महाऊसचं कर्ज फेडण्यासाठीच प्राजक्ताने असं कॅप्शन दिलं असावं, असं नेटकरी म्हणत आहेत.

प्राजक्ताच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ‘तुमच्यासारखी कर्ज आम्हाला पण होऊदेत आणि तुमच्यासारखं काम पण मिळू दे रे देवा’, असं एकाने लिहिलं. तर ‘टेन्शन नॉट प्राजू. सगळं होईल. कर्ज काय ते तर फिटेलच. तुझी सगळी स्वप्नं पूर्ण होवोत असंच देवाकडे मागेन मी’, असं दुसऱ्या चाहत्याने म्हटलंय.

अभिनयासोबतच प्राजक्ता वेगवेगळे प्रयोगही करताना दिसते. काही दिवसांपूर्वी तिचं कवितांचं पुस्तकसुद्धा प्रकाशित झालं होतं. नंतर तिने मराठमोळ्या दागिन्यांचा ब्रँड काढला. प्राजक्ता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या प्रचाराच्या रणधुमाळीतही उतरली आहे. नुकताच तिने आर्णी याठिकाणी भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी रोड शो केला. त्याचेही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.