बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले तसेच विधानसभा आणि लोकसभेमध्येही उमटले. महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभेत आणि खासदारांनी लोकसभेत हा विषय मांडून न्याय देण्याची मागणी केली. यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मस्साजोग गावात जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. “या घटनेतील मास्टरमाईंड कोणीही असो, त्याला सोडणार नाही. आरोपींवर कारवाई करण्यात येईल, ” असं आश्वासन अजित पवार यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना दिलं आहे.
संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना अजित पवार काय म्हणाले?
“ही घटना खूप वेदनादायी आहे. आम्ही या प्रकरणाची दोन प्रकारे चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. खरं तर ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. तुमच्यावर मोठा अघात झाला आहे. आता गेलेली व्यक्ती परत येऊ शकत नाही. मात्र, या प्रकरणात ज्यांचे कोणाचे लागेबांधे असतील आणि जो कोणी मास्टरमाईंड असेल त्या कोणालाही आम्ही सोडणार नाही. पोलिसांनी देखील यावर अॅक्शन घेतली आहे”, असं अजित पवार यांनी म्हटलं.
मस्साजोगच्या ग्रामस्थांशी बोलताना अजित पवार काय म्हणाले?
संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर गावकऱ्यांशी बोलताना अजित पवार म्हणाले, “तुमच्या गावामध्ये जी घटना घडली त्या घटनेचं दु:ख आहे. मी तुम्हाला हा विश्वास देण्यासाठी आलो आहे की, कोणत्याही परिस्थितीत कोणताही राजकीय हस्तक्षेप या प्रकरणात होणार नाही. माझा तुम्हाला शब्द आहे की कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. यामध्ये जो कोणी मास्टरमाईंड आहे, त्यालाही सोडलं जाणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सभागृहात आरोपींवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे. या घटनेची आम्ही दोन प्रकारे चौकशी करणार आहोत. एक म्हणजे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या माध्यमातून आणि न्यायालयीन चौकशी देखील करणार आहोत. यामध्ये काही त्रुटी राहणार नाहीत याची काळजीही घेतली जाईल”, असं आश्वासन अजित पवारांनी मस्साजोगच्या ग्रामस्थांना दिलं.