महाराष्ट्रात निवडणुका आणि पावसाचं जुनं आहे. 2019 च्या लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी साताऱ्यात भर पावसात घेतलेल्या सभेमुळे उदयनराजे भोसले यांना पराभवाचा सामना करावा लागाल होता. त्या सभेची आजही राज्यात चर्चा असते. दरम्यान, आजचा(दि.15) दिवसदेखील पावसातील सभेमुळे चर्चेत राहणारा आहे. राज्यातील दोन दिग्गज नेत्यांनी आज भर पावसात सभा घेतल्या.
आज बत्तीस शिराळा इथं महायुतीचे उमेदवार सत्यजीत देशमुख यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत अचानक पाऊस सुरू झाला. या पावसातदेखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले भाषण केले. आपल्या भाषणातून त्यांनी राजकीय टोलेबाजीही केली. “या ठिकाणी उपस्थित माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, तुम्हाला सांगतो..आता सत्यजीत दादा तुमची सीट निवडून येणं पक्क आहे. का बरं पक्क आहे? अरे मी पावसात सभा घोतोय ना? पावसात सभा घेतली की सीटा निवडून येतेच. हे शुभ संकेत आहे,” असं फडणवीस म्हणाले.
ते पुढे म्हणतात, “काही नेत्यांचं म्हणणं आहे की, पावसात सभा झाली की निवडून येते. पण मी तुम्हाला सांगतो की, पाऊस पडो किंवा न पडो. पण मतांचा पाऊस पडणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. सत्यजीत देशमुखांच्या रुपात आपल्याला सुसंस्कृत नेता आणि जमीनीवर काम करणारा नेता मिळाला आहे. वाकुर्डी बुद्रुकची योजना युती सरकारणे आणली होती. पण त्यानंतर 1999 ते 2014 पर्यंत योजना बंद पडली. त्याकाळी जयंत पाटील पालकमंत्री, अर्थमंत्री आणि जलसंपदा मंत्री होते, पण त्यांनी या प्रकल्पासाठी फुटकी कवडी दिली नाही. मी मुख्यमंत्री झालो आणि एका झटक्यात 100 कोटी रुपये या योजनेसाठी दिले,” अशी टीकाही फडणवीसांनी यावेळी केली.