Breaking News

देवेंद्र फडणवीसांची नवी चाल; सचिन वाझेंच्या आरोपानंतर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया

आज मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी अनिल देशमुख हे त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे, असा आरोप केला आहे. तसेच यासंदर्भात सर्व पुरावे सीबीआयकडे असून आपण देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं असल्याचेही त्यांनी म्हटले. यावर अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली. ही देवेंद्र फडणवीस यांची नवीन चाल आहे. सचिन वाझेंच्या मार्फत माझ्यावर आरोप करण्यात येत आहेत, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी मी प्रतिज्ञापत्र करुन द्यावे, यासाठी माझ्यासमोर जो प्रस्ताव आणला होता, मी ही गोष्ट ज्यावेळी मी महाराष्ट्रातील जनतेसमोर आणली. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांची ही नवीन चाल आहे. सचिन वाझे गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे, हे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. सचिन वाझेला आतापर्यंत दोन हत्येच्या गुन्ह्यात अटक झाली. आणखी एका हत्येच्या गुन्ह्यात तो तुरुंगात आहे. सचिन वाझे हा विश्वास ठेवण्यालायक व्यक्ती नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.शा या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सचिन वाझेला हाताखाली धरुन देवेंद्र फडणवीस हे माझ्यावर आरोप करायला लावत आहेत. मी जे आरोप फडणवीसांवर केले होते, त्यामुळे त्यांनी सचिन वाझेला माझ्यावर आरोप करायला सांगितले जात आहेत’, असे अनिल देशमुख म्हणाले.

सचिन वाझे यांनी अनिल देशमुख यांच्यावर अरोप करताना म्हटले आहे की, ‘जे काही झाले, त्याचे पुरावे आहेत. अनिल देशमुख हे त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे, यासंदर्भात सर्व पुरावे सीबीआयकडे असून आपण देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे. मी पुरावे सादर केले आहेत. मी या प्रकरणात नार्को टेस्ट करायलाही तयार आहे. मी लिहिलेल्या पत्रात जयंत पाटील यांचेही नाव आहे.’

मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी शहरातील हॉटेल आणि बार मालकांकडून पैसे गोळा करण्याचे आदेश पोलिस अधिकाऱ्यांना दिल्याचा आरोप केल्यानंतर देशमुख यांनी ५ एप्रिल २०२१ रोजी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. हा आरोप सिंग यांनी नंतर मागे घेतला. पण त्यानंतर नोव्हेंबर २०२१ मध्ये सक्तवसुली संचालनालयाने आणि त्यानंतर एप्रिल २०२२ मध्ये भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सीबीआयने राष्ट्रवादीच्या नेत्याला अटक केली होती. आता जामिनावर सुटल्यानंतर त्यांनी नागपुरातील सिव्हिल लाइन्स येथील निवासस्थानी प्रदीपकुमार मैत्रा यांची भेट घेऊन आपल्या आरोपांची सविस्तर माहिती दिली. खोट्या प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्यानंतर ईडी आणि इतर केंद्रीय यंत्रणांनी त्यांच्या विविध घरांवर १३० वेळा छापे टाकल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले होते.