राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित वरळी डोम येथील शोकसभा अत्यंत शोकाकुल वातावरणात पार पडली. उपस्थित सर्वपक्षीय मान्यवर नेते मंडळी आणि समाजाच्या विविध स्तरातील उपस्थित मान्यवरांनी अजित पवारांसोबतच्या आठवणींना उजाळा देत दादांना आपली श्रद्धांजली वाहिली. या शोकसभेला राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी सरन्यायाधीश भूषण गवई, सुनिल तटकरे, प्रफुल पटेल, मंत्री छगन भुजबळ, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार व जय पवार तसंच पवार कुटुंबीय, उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी, सर्वपक्षीय नेतेमंडळी त्याचबरोबर समाजातील विविध स्तरातील लोक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं, “आपल्यापैकी कुणावरही अशी वेळ येईल, याची कल्पना नव्हती. अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एकत्र आलोत. महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा आहे. आपल्या कामानं त्यांनी ‘जनतेचा नेता’ अशी प्रतिमा निर्माण केली होती. राज्याच्या कानाकोपऱ्याची त्यांना अचूक माहिती असायची. प्रत्येक तालुक्यापर्यंतच्या घडामोडींवर त्यांची पकड होती. ते एक सक्षम आणि कुशल प्रशासक होते. अजितदादांनी आजवर अकरा अर्थसंकल्प मांडले. आर्थिक शिस्त हा त्यांचा बाणा होता. आर्थिक निर्णय घेताना त्यांनी कधीही बेशिस्तपणा केला नाही. कोणतीही फाईल त्यांच्या टेबलावर प्रलंबित राहात नसे; ते त्वरित निर्णय घेत. बैठका वेळेवर घेणे आणि मुद्देसूद चर्चा करणे ही त्यांची कार्यपद्धती होती. एखाद्या अधिकाऱ्याने मांडलेला मुद्दा पटला, तर ते स्पष्टपणे सांगत की हा निर्णय योग्य नाही, जरी तो आपल्या पक्षातील नेत्यांविरोधात असला तरी.”
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावना व्यक्त करताना सांगितलं की, साल 1991 पासून सक्रिय राजकारणात अनेक महत्त्वाची पदं अजितदादांनी भूषविली. दादा हे अतिशय स्पष्टवक्ते होते. त्यांनी आपली मतं नेहमीच परखडपणे मांडली. राज्याच्या विकासाचा ध्यास त्यांनी सतत कायम ठेवला होता. दादा, मी आणि देवेंद्रजी आमच्या तिघांचं बाँडिंग जबरदस्त जमलं होतं. आम्ही एकमेकांच्या मनातील गोष्टी सहज ओळखत होतो. आमचे संबंध नेहमीच अतिशय घट्ट आणि मैत्रीपूर्ण होते. मात्र दुर्दैवानं, काळाच्या मनातील संकेत आम्हाला ओळखता आले नाहीत. घरातला माणूस जाण्याचं दु:ख काय असतं हे मी जाणतो, असं सांगताना एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुलांच्या अपघाताची आठवण करून दिली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की, आम्ही विधीमंडळात असताना आमच्यात घट्ट मैत्री निर्माण झाली होती. ते दिल्लीला आले की नेहमी मला आवर्जून भेटायचे. गडकरी म्हणाले की, छोट्या-छोट्या बाबींपासून ते मोठ्या विकासकामांपर्यंत प्रत्येक गोष्टींवर त्यांचं बारीक लक्ष असायचं. जनतेच्या हितासाठी ते स्पष्टपणे आणि ठामपणे आपली भूमिका मांडायचे. त्यांचं असं अकाली जाणं हे महाराष्ट्रासाठी एका मोठा आघात असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
“आयुष्यात आजवर अनेक शोकसभांना गेलो; पण दादांच्या शोकसभेलाही जावं लागेल, असं कधीही वाटलं नव्हतं. ऐन उमेदीच्या वयात आणि ज्या पद्धतीनं ते आपल्यातून निघून गेले, तो सर्वांसाठी एक मोठा धक्काच आहे. राज्यभरातील लाखो लोक आज त्यांच्यासाठी हळहळतायत. दादांबद्दल प्रत्येकाच्या मनात अपार प्रेम आहे. प्रत्येक ठिकाणी वेळेवर पोहोचणारे दादा आज मात्र असे अवेळी का निघून गेले?” अशी भावना छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
“चिठ्ठी ना कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहाँ तुम चले गए….” या जगजीत सिंह यांनी गायलेल्या गझलमधून जयंत पाटलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते पुढे म्हणाले, “सकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत काम करणारा नेता. विकासकाम पाहायची, तर बारामतीला येऊन पाहा, असं सागताना त्यांनी केवळ मतदारसंघच नव्हे, तर संपूर्ण राज्याची बांधणी केली. असं म्हणत शेवटी जयंत पाटील यांनी, “इक आह भरी होगी… जाते जाते तुमने, आवाज तो दी होगी…” या ओळींमधून आपल्या भावना व्यक्त केल्या.
“गेल्या पन्नास वर्षांपासून माझे अजितदादांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. आज इतकी मंडळी येथे जमलीत, परंतु हीच मंडळी त्यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त जमली असती, तर अधिक समाधान वाटलं असतं.” अशी भावना ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांनी व्यक्त केली.
28 जानेवारी 2026 रोजी बारामतीत झालेल्या विमान अपघातातील निधनानंतर, अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत ही शोकसभा पार पडली. अजितदादांच्या अकाली निधनानं राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांच्या कार्याची आणि व्यक्तिमत्त्वाची आठवण शोकसभेतील सर्व मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आली. सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत पार पडलेली ही सभा त्यांच्या आजवरच्या कार्याला वाहिलेली एक भावनिक आदरांजली ठरली.












