मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात शुक्रवारी घडलेल्या घटनेमुळं राजकीय वातावरण तापलं आहे. विद्यमान महापौर रितू तावडे आणि माजी महापौर तथा विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्यात थेट संघर्ष उफाळून आला. महापौर आपल्या दालनात नसताना पेडणेकर त्यांच्या कार्यालयीन परिसरात गेल्या, तेथील कर्मचाऱ्यांशी चर्चा केली आणि कागदपत्रांची पाहणी केल्याचा आरोप तावडे यांनी केला. यानंतर दोघींमध्ये फोनवरून शाब्दिक चकमक झाली. या घटनेनंतर महापौरांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे.
घटनेनंतर महापौर रितू तावडे यांनी माहिती दिली की, “दुपारी सुमारे 3.45 वाजता मी कार्यालयात नव्हते. मी रस्त्यावर मॅनहोल तपासणी आणि संबंधित कामांचा आढावा घेत होते. त्याचवेळी किशोरी पेडणेकर माझ्या केबिनमध्ये आल्या. त्या म्हणतील की, त्या केबिनमध्ये गेल्या नाहीत, पण माझ्या केबिनचा परिसर मुख्य प्रवेशद्वारापर्यंत आहे. तिथे महत्त्वाच्या पत्रव्यवहाराची तयारी केली जाते. त्यांनी कॅमेरा सुरू केला. सीसीटीव्हीमध्ये त्यांच्या सहकाऱ्याने संपूर्ण केबिनचे चित्रीकरण केल्याचं दिसतं. जर फक्त एखादे पत्र तपासायचे होते, तर चारही बाजूंचे चित्रीकरण करण्याची गरज काय होती? यामागे रेकी करणं, अतिक्रमण करणं किंवा महत्त्वाच्या कागदपत्रांचे फोटो घेण्याचा हेतू असू शकतो.”
तावडे यांनी पुढे सांगितलं की, मुंबई महापालिकेच्या इतिहासात विरोधी पक्षनेत्याने अशी कृती कधीच केली नव्हती. कोणती कागदपत्रे छायाचित्रित करण्यात आली याची माहिती नसून हा गंभीर गुन्हा असल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करत त्यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केल्याचं स्पष्ट केलं. याचवेळी साकीनाका येथील मॅनहोल दुर्घटनेबाबत बोलताना तावडे म्हणाल्या की, तेथे दोन महिन्यांपासून काम सुरू होते. सुरक्षेसाठी ग्रिल बसविण्याचं काम सुरू असताना मॅनहोलचं झाकण तात्पुरतं काढण्यात आलं होतं. माध्यमांमध्ये मॅनहोल पूर्णपणे उघडा असल्याच्या बातम्या आल्या, मात्र प्रत्यक्षात झाकण होतं, असा दावा त्यांनी केला. तसेच, मुंबईतील सर्व वॉर्डमधील मॅनहोलचे ऑडिट सुरू असून प्रत्येक वॉर्डातील नगरसेवक आणि प्रशासन प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून तपासणी करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
दुसरीकडं, किशोरी पेडणेकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. आपण महापौरांच्या खासगी केबिनमध्ये घुसलो नसून कार्यालयीन परिसरात नागरिकांच्या तक्रारी आणि प्रशासनाच्या कामकाजाची माहिती घेण्यासाठी गेलो होतो, असा त्यांचा दावा आहे. कोणतीही गोपनीय कागदपत्रे पाहिली किंवा चित्रीकरणाचा गैरवापर केला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. उलट महापालिकेच्या कामकाजातील पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित करण्यासाठी आपण तेथे गेल्याचं त्यांनी म्हटलं.
सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. एका बाजूला महापौरांनी हा कार्यालयीन सुरक्षेबाबत गंभीर प्रकार असल्याचा दावा केला आहे, तर दुसरीकडं विरोधकांनी हा मुद्दा प्रशासनातील पारदर्शकतेशी जोडला आहे. आता पोलीस चौकशी, सीसीटीव्ही फुटेज आणि महापालिकेच्या नोंदींवरून या वादाचे पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.














Leave a Reply