kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

“फक्त पैसे आहेत म्हणून चित्रपट निर्माते होऊ नका” ; राज्यभरातील चित्रपट निर्मात्यांना ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते सचिन यांचा सल्ला

“कथा हा चित्रपटाचा आधारस्तंभ असतो. तो भक्कम आणि अस्सल हवा. तुमच्याकडे फक्त पैसे आहेत, म्हणून चित्रपट निर्माते होऊ नका. चित्रपट माध्यमाचा अभ्यास करा. कथा आणि आशय, जाणून घ्या”, असा सल्ला ज्येष्ठ चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते सचिन पिळगावकर यांनी रविवारी येथे राज्यभरातील चित्रपट निर्मात्यांना दिला.

‘मेघराज राजेभोसले फाऊंडेशन’ आणि ‘सूर्यदत्त प्राॅडक्शन हाऊस’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी चित्रपट निर्मात्यांसाठीच्या ‘निर्मिती संवाद’ या कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

सूर्यदत्त इन्स्टिट्यूटच्या बावधन येथील शैक्षणिक संकुलात रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळात ही कार्यशाळा पार पडली. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या ४०० हून अधिक चित्रपट निर्मात्यांचा या कार्यशाळेत सहभाग होता. चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रातील नामवंत निर्माते, दिग्दर्शक, कमेरामन, संकलक, वितरक, थिएटर मालक, वाहिन्यांचे कार्यकारी अधिकारी, क्रिएटिव्ह हेड, ओटीटीतज्ञ अशा अनेक विषयतज्ञांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष आणि मेघराज राजेभोसले फाऊंडेशनचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, सूर्यदत्त इन्स्टिट्यूटचे संस्थापक संचालक डॉ. संजय चोरडिया, ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे तसेच अभिनेत्री व निर्माती तेजस्विनी पंडित यांनी या कार्यशाळेत विचार मांडले.

सचिन पुढे म्हणाले, “शिकणे ही निरंतर सुरू असणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे आपली विद्यार्थीवृत्ती सदैव जपली पाहिजे. सर्जनशील माणसाचे डोळे आणि कान सदैव उघडे असले पाहिजेत. मी ६१ वर्षे या क्षेत्रात वावरत आहे. मी भारतीय चित्रपटसृष्टीचा एक भाग आहे, याचा मला अभिमान वाटतो. माझ्यातील दिग्दर्शकाला न्याय मिळावा, म्हणून मी निर्माता झालो. नाटक हे नटाचे, टेलिव्हिजन हे लेखकाचे तर चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे. तुम्ही निर्मात्यांचे दिग्दर्शक व्हा. निर्मात्याचे नुकसान होणार नाही, हे पहा. २३ चित्रपट दिग्दर्शित केल्यावर मी सांगतो, की सिनेमा फ्लाॅप होत नाही, तुमचे बजेट फ्लाॅप झालेले असते. त्यामुळे बजेटवर नियंत्रण ठेवायला शिकून घ्या. शासनानेही निर्मात्यांना आर्थिक साह्य देण्याबरोबर इतरही काही घटकांसाठी मदत करावी”, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. आगाशे यांनी शब्द, चित्र आणि ध्वनी या तीन भाषांपैकी चित्र आणि ध्वनी (संगीत) या भाषांची साक्षरताच पुरेशी नसल्याची खंत व्यक्त केली.

तेजस्विनी पंडित म्हणाल्या, “मी अभिनेत्री म्हणून २० वर्षे चित्रपटसृष्टीत वावरले. त्यानंतर निर्मातीच्या भूमिकेत आल्यावर, निर्माता ही किती मोठी जबाबदारी आहे, याची जाणीव झाली. कोणत्याही परिस्थितीत, हार मानायची नाही, ही वृत्ती निर्मात्याने अंगी बाणवली पाहिजे. निर्मिती क्षेत्रात काही प्रकल्पांसाठी निर्मात्यांनी समूहनिर्मितीचा प्रयोग करावा म्हणजे ग्लॅमर नाही, तंत्रज्ञानाच्या दृष्टीने मराठी चित्रपट फारसे पुढारलेले नाहीत आणि लार्जर देन लाईफ असे मराठीत काही नसते, या आक्षेपांना उत्तरे देणे शक्य होईल”, असेही त्या म्हणाल्या.

मेघराज राजेभोसले यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले. पराग चौधरी आणि आसावरी नितीन यांनी सूत्रसंचालन केले.