हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्याविरोधात आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बाहेरगावी असणाऱ्या मतदारांना येण्या-जाण्यासाठी फोन पे द्वारे पैसे पाठवा, असं वक्तव्य संतोष बांगर यांनी केलं होतं. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आमदार संतोष बांगर यांना 24 तासाच्या आत खुलासा करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज खुलासा सादर केल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

नुकतंच ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांनी देखील याबाबत व्हिडीओ शेअर केला होता. त्यांनी त्या व्हिडिओमध्ये संतोष बांगर यांच्याबाबत कथित क्लिप देखील दाखवली होती. तसेच संतोष बांगर यांच्यावर कारवाई होणार का असा प्रश्न देखील त्यांनी विचारला होता.

दरम्यान, संतोष बांगर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, मी कोणतीही वक्तव्य केलेली नाही. ती विरोधकांनी तयार केलेली कॉपी आहे. त्यामुळे माझ्या विरोधात जे काही झालं आहे ते सर्व चुकीचं आहे. विरोधकांकडे काही काम राहिलेलं नाही, असा आरोप त्यांनी केला. आपल्याला निवडणूक आयोगाकडून नोटीस आलेली नाही. नोटीस आल्यानंतर नंतर सुद्धा हाच खुलासा करणार असल्याचे संतोष बांगर म्हणाले. तो व्हिडिओ माझाच आहे, पण एडिट करून आवाज लावलेला दिसतो असा दावा सुद्धा संतोष बांगर यांनी केला. ते पुढे म्हणाले की फोन पे चा अर्थ मला माहित नाही. गुगल पे सुद्धा मला माहित नाही असे संतोष बांगर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *