kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

खा. सुळे दुसऱ्यांदा ठरल्या विशेष संसद महारत्न ;दिल्ली येथे १७ फेब्रुवारी रोजी होणार पुरस्कार प्रदान

चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि इ- मॅगॅझीनतर्फे दर पाच वर्षांनी देण्यात येणारा संसद महारत्न पुरस्कार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना दुसऱ्यांदा जाहीर झाला आहे. विद्यमान सतराव्या लोकसभेतील त्यांची उपस्थिती, जनहिताचे उपस्थित केलेले प्रश्न, चर्चेतील सहभागासाठी, खासगी विधेयक आणि अनुकरणीय सर्वोत्तम कामगिरीसाठी हा पुरस्कार जाहीर झाला असून यापूर्वी सोळाव्या लोकसभेतील कामगिरीसाठीसुद्धा त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. येत्या १७ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांना हा पुरस्कार दिल्ली येथे प्रदान करण्यात येणार आहे.

लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना प्राईम पॉईंट फौंडेशनतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे, असे फौंडेशनचे के. श्रीनिवासन यांनी कळविले आहे. चालू सतराव्या लोकसभेत सुळे यांच्या कामगिरीतील सातत्य कायम असून ५ डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत त्यांनी ९४ टक्के उपस्थिती लावत २३१ चर्चासत्रात भाग घेतला आहे. सभागृहात त्यांनी आतापर्यंत ५८७ प्रश्न विचारले असून १६ खासगी विधेयके मांडली आहेत. या कामगिरीसाठी त्यांना पुन्हा एकदा संसद महारत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. तर याच संस्थेचा संसदरत्न पुरस्कार त्यांना सात वेळा प्रदान करण्यात आला आहे. यापूर्वीही त्यांना सर्वोत्तम कामगिरीसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

गत सोळाव्या लोकसभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी सभागृहात ९६ टक्के उपस्थिती लावत १५२ चर्चासत्रांत सहभाग घेतला. त्यांनी एकूण ११८६ प्रश्न उपस्थित केले, तर २२ खासगी विधेयके मांडली आहेत. ज्युरी कमिटीचे चेअरमन व केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि सह चेअरमन व भारतीय निवडणूक आयोगाचे माजी अध्यक्ष टी एस कृष्णमूर्ती यांनी सुळे यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. खासदार सुळे यांची संसदेतील सातत्यपूर्ण सर्वोत्तम कामगिरी आणि त्याच वेळी आपल्या मतदार संघातील नागरिकांसाठी जनहीताची केलेली कामे यांचा या पुरस्कार निवडीसाठी विचार करण्यात आला आहे.

पुरस्कार म्हणजे कामाला मिळालेली पावती ; खासदार सुळे यांची भावना

प्राईम पॉईंट फौंडेशन, चेन्नई यांच्या वतीने सर्वोत्कृष्ट संसदीय कामगिरीसाठी दर पाच वर्षांनी देण्यात येणाऱ्या विशेष संसद महारत्न पुरस्कारासाठी आपली निवड करण्यात आली असून बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेने ज्या विश्वासाने आपल्याला लोकसभेत निवडून पाठविले तो सार्थ ठरविण्यासाठी आपण सदैव कार्यरत आहे, अशा शब्दात खासदार सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हा पुरस्कार आपल्या कामाला मिळालेली पावती आहे. अर्थात हे यश माझ्या मतदारसंघातील प्रत्येकाचे आहे. म्हणूनच हा पुरस्कार मतदारसंघातील जनतेला कृतज्ञतापूर्वक अर्पण करताना मला अतिशय आनंद होत आहे. हा पुरस्कार १७ व्या लोकसभेतील सर्वोत्तम कामगिरीसाठी देण्यात येत आहे. यापुर्वीही १६ व्या लोकसभेतील सर्वोत्तम कामगिरीसाठी देखील हाच पुरस्कार मिळाला होता, असे त्यांनी पुढे नमूद केले आहे.