बारामती येथील देसाई इस्टेट क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या खुल्या बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेला आज खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली. काही खेळाडूंसोबत त्यांनी यावेळी बॅडमिंटन खेळाचा आनंद लुटला.

रॅकेट हातात आल्यानंतर इतक्या सहजपणे त्या कशा काय खेळू शकल्या, याबाबत उपस्थित सर्वांनाच आश्चर्य वाटले. त्यावर बोलताना सुळे यांनी, त्या स्वतः तर बॅडमिंटन खेळलेल्या आहेतच, याशिवाय त्यांच्या सासरी बॅडमिंटन या खेळाची मोठी परंपरा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

त्या म्हणाल्या, सदानंद सुळे यांच्या आई शशी सुळे या राष्ट्रीय पातळीवरील बॅडमिंटनपटू होत्या. शशी सुळे यांचे बंधू म्हणजे विक्रम भट हे देखील बॅडमिंट खेळाडू होते. बॅडमिंटनचा इतिहास चाळला, तर भारताचे प्रसिद्ध बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांच्यासोबत शशी सुळे यांचे नावे बघायला मिळेल. सुळे यांनी जागविवलेल्या या आठवणी उपस्थित नव्या खेळाडूंसाठी मोठी पर्वणीच होती. अत्यंत उत्साह आणि औत्सुक्यपूर्ण भावनेने पहात खेळाडूंनी टाळ्यांचा गजरात खासदार सुप्रिया सुळे यांचे स्वागत केले.