स्वित्झर्लंडमधील दावोस शहरात जागतिक आर्थिक परिषद होत आहे. यासाठी भारताकडून महत्वाचे नेते उपस्थित आहेत. महाराष्ट्राचं शिष्टमंडळही दावोसमध्ये पोहोचलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महाराष्ट्राचं शिष्टमंडळ दावोसंध्ये झालं. यावेळी बृहन महाराष्ट्र मंडळाने त्यांचं स्वागत केलं.
एवढ्या भल्या पहाटे, कुडकूडणाऱ्या थंडीत, मराठमोळा वेष परिधान करून माझ्या स्वागतासाठी आलेल्या सर्व मराठी बांधव भगिनींचे आभार मानतो. तसेच परदेशातही आपल्या संस्कृतीशी असलेले घट्ट नाते जपून ठेवल्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक, मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. जागतिक आर्थिक परिषदेत पहिल्या दिवशी संयुक्त अरब अमिरातीचे वाणिज्यमंत्री अब्दुला बिन टौक आणि लुलू हायपरमार्केटचे कार्यकारी संचालक एम.ए. युसुफ अली यांची आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली. यावेळी उद्योगांबाबत चर्चा झाली.
देशातील एक मोठा उद्योग समूह असलेल्या बी.सी. जिंदाल यांच्याशी 41 हजार कोटींच्या सामंजस्य करारावर आज दावोसमध्ये स्वाक्षऱ्या केल्या. या सामंजस्य करारामुळे इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात सुमारे 5 हजार नोकऱ्या महाराष्ट्रात निर्माण होणार आहेत, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. दावोसमधील या आर्थिक परिषदेत ग्रीन हायड्रोजनच्या धोरणाला बळकटी देण्यासाठी करार करण्यात आला. या परिषदेत आयनॉक्स एअर प्रॉडक्शन या कंपनीबरोबर सुमारे 25 हजार कोटींच्या सामंजस्य करारावर मुख्यमंत्री शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली.
महाराष्ट्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा हब निर्माण करण्यासाठी ‘महाप्रीत’ आणि अमेरिकेच्या प्रिडीक्शन्स यांच्यात सुमारे 4 हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे महाराष्ट्रात नाविन्यपूर्ण अशा आर्टिफिशियल इंटेलिजन्सबाबतचा प्रकल्प सुरू होईल. हा भारतात सुरू होणारा पहिलाच प्रकल्प आहे.