राज्यामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच, ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपवर टीका करताना भाजपने नवाब मलिक यांच्याबाबत भूमिका स्पष्ट करावी, असं म्हटलं होतं. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, आम्ही कुणाच्या मांडीला मांडी लावून बसत नाही. मी फक्त एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मांडीला मांडी लावून बसलो आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. अशातच आता त्यांनी आणखी एक मोठा लेटरबॉम्ब टाकला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना एक पत्र लिहीले असून नवाब मलिक यांना युतीत समाविष्ट करुन घेण्यास विरोध केला आहे. “सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही”, अशा शब्दांत फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
कोण काय म्हणाले ?
- विजय वडेट्टीवार :
फडणवीस यांचे पत्र हे महायुतीच्या रणनीतीचा एक भाग असण्याची शक्यता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी वर्तवली आहे. नवाब मलिक यांच्या वादातून भाजपला दोन हात लांब राहायचे असेल. भाजप हा धूर्त राजकारण्यांचा पक्ष आहे, ते याच्यातून मार्ग काढतील असेही वडेट्टीवार यांनी म्हटले.
विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, नवाब मलिक यांच्यावर झालेल्या आरोपांमध्ये तथ्य नव्हते. दुर्दैवाने त्यांना तुरुंगात राहावं लागलं. नवाब मलिक यांनी प्रतिज्ञापत्र लिहून करत अजित पवार गटाला पाठिंबा दिला हे मात्र खरं असल्याचे त्यांनी म्हटले. त्यापुढे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले की, नवाब मलिक हे अजित पवार गटासोबत आहे म्हणजेच महायुती सोबत आहे. आज विधान परिषदेत आरोप झाल्यानंतर एक रणनीतीचा भाग म्हणून फडणवीस यांनी पत्र लिहिले असेल किंवा ट्विट केला असेल. उलट पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून नवाब मलिक यांना त्यांच्या मतदारसंघासाठी भरपूर निधीही दिला आहे आणि तो निधी त्यांना महायुतीचा आमदार असं गृहीत धरून दिला असल्याचा असल्याचा दावा त्यांनी केला. आता भाजपला या वादातून सुटका मिळवायची असेल म्हणून फडणवीस यांचा पत्र लिहून तसा प्रयत्न असावा. ही मुळीच महायुतीमध्ये वादाची सुरुवात नाही. तर हे पत्र म्हणजे महायुतीच्या रणनीतीचा भाग असल्याचेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.
नवाब मलिक यांचा उल्लेख सभागृह मध्ये यापूर्वी देशद्रोही म्हणून केला गेला. त्यामुळे देशद्रोही माणूस आपल्या बाजूला बसला तर अनेक प्रश्न निर्माण होतील. त्यातून आपली सुटका व्हावी यासाठी हे प्रयत्न असावे. महायुतीला नवाब मलिक हे सोबतही पाहिजे आणि जवळ ही नको असल्याचे त्यांनी म्हटले. भाजप हुशार पक्ष आहे फार हुशार आणि धूर्त राजकारण्यांचा पक्ष आहे, ते याच्यातून मार्ग काढतील.. नवाब मलिक यांना आम्ही निमंत्रण देणार नाही.. आम्ही आता विरोधात आहोत तसही तो राष्ट्रवादीशी संबंधित प्रश्न आहे आमच्या पक्षाशी संबंधित नाही असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
- सुप्रिया सुळे :
देवेंद्र फडणवीस हे पत्र न लिहिता अजित पवारांना फोन करुनही सांगू शकत होते. त्यामुळे हे सगळं षडयंत्र असल्याची शंका येत असल्याची प्रतिक्रिया यावेळी सुप्रिया सुळेंनी दिली.
राष्ट्रवादीचे नेते जेलमध्ये होते तेव्हा मी सर्वांना भेटले. अडचणीच्या काळात सोबत राहावं लागतं. प्रत्येक वेळी आम्ही त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या सोबत होतो. नवाब मलिकांवर माझा पूर्ण विश्वास असून त्यांच्या मागे सुप्रिया सुळे पूर्ण ताकदीने उभी राहिल, असा विश्वास देखील सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केला.
आम्ही कुणावर सीबीआय, ईडीचे लावली नाही. सुडाचं राजकारण आम्ही केलं नाही. भारतात सध्या गलिच्छ राजकारण सुरु आहे. त्यामुळे नबाव मलिकांच्या मागे षडयंत्र असल्याची शंका मला येतेय. पण मलिकांवर माझा पूर्ण विश्वास आहे. सध्या भाजप हे पक्ष, लोकांना फोडण्याचं गलिच्छ काम काम करतं. अडवाणींच्या भाजपनं असं सूडाचं राजकारण केलं नाही. पण आता भाजपात असलेली अदृश्य शक्ती हे काम करतेय, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.
- सुनिल तटकरे :
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी ट्वीट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नवाब मलिक हे आमचे अनेक वर्षांपासूनचे ज्येष्ठ सहकारी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत मधल्या कालावधीत घडलेल्या घडामोडींशी त्यांचा कुठलाही संबंध नसल्याचे त्यांनी म्हटले. आजारपणाच्या मुद्द्यावर त्यांना जामीन मिळाल्यानंतर जुने सहकारी म्हणून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आमची भेट झाली. आम्ही त्यांच्याशी कुठलीही राजकीय चर्चा केलेली नाही. आज विधानसभेत आल्यानंतर जुन्या सहकार्यांशी त्यांचा संवाद आणि भेट होणे स्वाभाविक असल्याचे तटकरे यांनी म्हटले.