माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे उद्धव ठाकरे यांना बाहेर थांबायला सांगताना दिसत आहेत. हा व्हिडीओ मॉर्फ असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, सकाळपासून सोशल मीडियावर या व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे. या व्हिडीओचा संदर्भ देत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. आता ही अवस्था तर येत्या 4 जून नंतर उद्धव ठाकरे यांची अवस्था काय होईल हे देवाला आणि अल्लाहला माहिती, असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला आहे.

संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन हा टोला लगावला आहे. एक व्हिडीओ मी पाहिला. शरद पवार हे उद्धव ठाकरेंना बाहेर बसायला सांगताना दिसत आहेत. येत्या 4 जून नंतर त्यांची अवस्था काय होईल ते देवाला आणि अल्लाहला माहिती, असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला. उद्धव ठाकरे यांची विधाने वेदनादायी आहेत. इतक्या लोकांनी अनेक वर्ष शिवसेनेसोबत काम केलंय. शिवसेना जपली. तुमची वक्तव्य पाहा, असं शिरसाट म्हणाले.

संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यावरही टीका केली. इम्तियाज जलील म्हणतात ते खरं आहे. इम्तियाज यांनी खैरेंना नमाजला नेलं पाहिजे. जग पुढे गेले आहे. कधीही सुंता करता येते. खैरेंची आधीची भाषणं आठवा. हिरवे साप म्हणणारे खैरे आता वाल्मिकी झाले आहेत. ठाकरे गट भरकटला आहे, असा घणाघाती हल्लाही त्यांनी चढवला.

अजित पवार यांना आमच्या बंडाची कल्पना होती. त्यांनी ती उद्धव ठाकरेंना सांगितली होती. मात्र त्यांच्या चमच्यांनी त्यांची दिशाभूल केली. त्यामुळे उद्धव साहेबानी लक्ष दिले नाही. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी केलेली धावपळ आपण पहिली. बाकी कुणी क्रेडिट घ्यावे यासाठी उठाव नव्हता, फक्त तानाजी सावंत यांनी केले नाही तर सगळ्यांनी मिळून केलं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्र येऊ शकतो असा संशय प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला होता. त्यावरही शिरसाट यांनी भाष्य केलं. प्रकाश आंबेडकर जे बोलले त्यात नवल वाटण्यासारखं नाही. काहीही होऊ शकतं, असं सांगतानाच प्रकाश आंबेडकर काही दिवसांनी आमची स्तुती करतील, असंही ते म्हणाले.