kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

गुढीपाडवा 2026 : ठाण्यात सर्वसमावेशकतेचा सामाजिक संदेश; नववर्ष स्वागतयात्रेत तृतीयपंथीय समुदाय होणार सहभागी

गुढीपाडव्याच्या निमित्ताने ठाण्यात निघणाऱ्या पारंपरिक नववर्ष स्वागतयात्रेला यंदा समावेशकतेची नवी जोड मिळणार आहे. “समर्थ ठाणे, सशक्त भारत” या संकल्पनेवर आधारित 50 हून अधिक चित्ररथांनी सजलेल्या या भव्य स्वागतयात्रेत यंदा प्रथमच तृतीयपंथीय (मंगलमुखी) समुदाय सहभागी होणार असून ठाणेकरांसाठी हा ऐतिहासिक क्षण ठरणार आहे.

श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यास आणि ठाणे महापालिकेच्या सहकार्याने चैत्र शुद्ध प्रतिपदा, 19 मार्च रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्ष स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आलं आहे. यंदा या स्वागतयात्रेचं 26 वे वर्ष असून या वर्षीच्या स्वागतयात्रेच्या स्वागताध्यक्षा म्हणून प्रसिद्ध निरुपणकार आणि मुलाखतकार डॉ. धनश्री लेले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी जल्लोषात निघणारी ही स्वागतयात्रा ठाण्याची ओळख बनली आहे. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशा, लेझीम पथके, विविध सांस्कृतिक सादरीकरणे आणि सामाजिक संदेश देणारे चित्ररथ यामुळं दरवर्षी या यात्रेला ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. यंदाही “समर्थ ठाणे, सशक्त भारत” या संकल्पनेवर आधारित 50 हून अधिक चित्ररथ विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय विषयावर प्रबोधन करणार आहेत.

यंदाच्या स्वागतयात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे तृतीयपंथीय समुदायाचा सहभाग आहे. या शोभायात्रेत प्रथमच मंगलमुखींना सहभागी होण्याचा मान ठाण्याच्या स्वागतयात्रेला मिळत आहे. सेवा भारती कोकण प्रांत ट्रस्ट, ठाणे जिल्हा यांच्या पुढाकारातून या मंगलमुखींना शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी निमंत्रण देण्यात आलं होतं. हा प्रस्ताव श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यासानं स्वीकृत केला आहे. त्यानुसार 19 मार्च रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाजवळ हे मंगलमुखी शोभायात्रेत सहभागी होणार आहेत. यामुळं समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचा आणि सर्वसमावेशकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचं न्यासाकडून सांगण्यात आलं.