पालखी महामार्गावरील हडपसर ते दिवे घाट या अंतराचे चौपदरीकरण आणि दुरुस्तीसाठी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाने ७९२.३९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी ही माहिती दिली असून आपल्या पाठपुराव्याला प्रतिसाद देत निधी मंजूर केल्याबद्दल केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नीतीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.

हडपसर ते दिवे घाट या पालखी महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी तसेच रस्त्यावरील खड्ड्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागते. याशिवाय घाट भाग हा वन विभागाच्या हद्दीत असल्याने रुंदीकरणास अडथळे येत होते. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे या सातत्याने या रस्त्याच्या कामासाठी केंद्रीय महामार्ग मंत्रालयाकडे पाठपुरावा करत होत्या. खासदार शरद पवार यांनीही याबाबत केंद्राकडे शब्द टाकला होता. त्याला अपेक्षित यश आले असून नुकतेच काही दिवसांपूर्वी निविदा काढण्याचे आदेश देण्यात आले. त्यावेळी ३९९.०२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यात आता वाढ करण्यात आली असून ७९२.३९ इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

या निधीसाठी खासदार सुळे यांनी गडकरी यांचे आभार मानले असून हे काम पुर्ण झाल्यावर हडपसर ते दिवे घाट या मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या बऱ्याच अंशी दूर होणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. या मार्गावरुन संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जाते. हा पालखी सोहळा देखील अतिशय उत्तम पद्धतीने पार पडू शकेल, असेही त्यांनी पुढे नमूद केले आहे.