एसटी कर्मचाऱ्यांकडून विविध मागण्यांसाठी संपाचं हत्यार उपसण्यात आलं आहे. गणेशोत्सव तोंडावर असताना एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. यानंतर मंत्री उदय सामंत यांची एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीनंतर उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. यावेळी त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना गणेशोत्सव असल्याने संप मागे घेण्याची विनंती केली. “सरकार आपल्या निर्णाबाबत सकारात्मक आहे. त्यामुळे आपणही गणेश भक्तांची गैरसोय होणार नाही, यासाठी संप मागे घ्या, असं आवाहन उदय सामंत यांनी केलं. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार नक्की सकारात्मक होतं, आहे आणि भविष्यातही कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ नये हीच भूमिका सरकारची राहिलेली आहे”, अशी भूमिका उदय सामंत यांनी मांडली.
“सरकारला सांगताना आनंद होतोय की, एसटी महामंडळाबाबत जे काही निर्णय घेतले गेले, त्यामध्ये महिलांसाठी अर्धतिकीट असेल, 75 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वृद्धांना मोफत प्रवास असेल, यामुळे जो डिफरन्स आहे, तो शासनाने द्यायला सुरुवात केली, आणि गेले कित्येक वर्ष एसटी महामंडळ जे थोडंफार मागे वाटत होतं त्याचं नुकसान भरण्यात आम्ही थोडंफार यशस्वी झालो. सगळच एसटी महामंडळ नफ्यामध्ये आलं आहे, असा माझा दावा नाही. पण या योजनांमुळे एसटी महामंडळाला बऱ्यापैकी शासनाकडून निधी उपलब्ध होतोय, हे देखील सगळ्या संघटनांना सांगितलं”, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.
“नवीन गाड्यांच्या बाबतीतही संघटनांशी चर्चा झाली. पण याचा निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आहे. मुख्यमंत्र्यांनी उद्या सात वाजता बैठक बोलावली आहे. या बैठकीचं पत्र देण्याचा प्रयत्न आम्ही आंदोलक कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाला देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे डेपोतील जे कर्मचारी असतात, त्यांच्याशी चर्चा करुन निर्णय देतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी देत बैठक संपली”, अशी माहिती सामंत यांनी दिली.
“मुख्यमंत्र्यांकडेच परिवहन विभाग आहे. त्यांच्या सूचनेनुसारच मी एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. अनेक वेळा, चार वर्षापूर्वीच्या संपातही माझ्या सारख्याच कार्यकर्त्याने मध्यस्थीची भूमिका घेतली होती. आजदेखील तशी भूमिका घेण्याचा मी प्रयत्न केला. मला एक गोष्ट समजत नाही. गणपती उत्सव हा इतका मोठ्या ताकदीचा उत्सव साजरा केला असतो. असं असताना अशा प्रकारचं आंदोलन होणं हे कितपत योग्य आहे, याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे”, असं मंत्री उदय सामंत म्हणाले.
“मी त्यांना विनंती केली की, सरकारमधील मुख्यमंत्री तुमच्यासोबत बैठक घेण्याबाबत पत्र देतात, त्यामध्ये खरेपणा आहे. उद्या मुख्यमंत्री तुमच्यासोबत बैठक घेतील तेव्हा चर्चा करा. तुमच्या प्रश्नांवर नक्की सकारात्मक निर्णय होईल, अशाप्रकारची भूमिका मी त्यांच्यापुढे मांडली. आमचे सहकारी आमदार सदाभाऊ खोत किंवा आमदार गोपीचंद पडळकर असतील, त्यांच्यासोबतही मी चर्चा करणार आहे. जेणेकरुन गणेशोत्सवात कोणत्याही नागरिकाला जाण्या-येण्यास त्रास होऊ नये, ही सरकारची भूमिका आहे”, असं उदय सामंत यांनी सांगितलं.
“एसटी कर्मचारी कायम स्वरुपी आनंदात असला पाहिजे ही भूमिका एकनाथ शिंदे यांची आहे. या सगळ्या प्रकरणात मी देखील मध्यस्थी करतो असं सांगितलं होतं. मी सर्वांना ओळखतो. त्यांनी जनतेचा विशेषत: गणेश भक्तांचा विचार करावा, ही माझी विनंती आहे”, असं आवाहन उदय सामंत यांनी केलं.