Breaking News

मला जातपात नाही… माझा एकच संग्रह आहे आणि तो म्हणजे माझा लोकसंग्रह – सुनिल तटकरे

मला जातपात नाही… माझा एकच संग्रह आहे आणि तो म्हणजे माझा लोकसंग्रह… मी जमीनीवर पाय ठेवून काम करणे याला जास्त महत्व देतो अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे यांनी आपली कार्यपद्धत महाडच्या आभार सभेत स्पष्ट केली.

काल काय झाले याकडे लक्ष न देता उद्याचा उष:काल कसा असेल यावर आता लक्ष केंद्रित करुया. महायुती म्हणून येणार्‍या विधानसभा लढवून पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आणण्याचा निर्धार आम्ही केला आहे असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

लोकसभेत जे काही घडले ते विसरुन उद्याचा नवा इतिहास विधानसभेत घडवण्यासाठी आपल्याला काम करायचे आहे असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले. देशात वातावरण निर्माण केले जात आहे त्यावेळी माझ्या पाठीशी महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता उभा राहिला. हीच अशी निवडणूक झाली की कोण विजयी होणार यावर मोठी चर्चा राज्यात सुरू होती. मी निवडणूकीत पराभूत होणार अशी चर्चा शेवटपर्यंत सुरू होती. मात्र मला विजयाची पक्की खात्री होती आणि तुमच्या आशिर्वादाने ८२ हजाराच्या मताधिक्याने विजयी झालो असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

अदृश्य शक्ती एकदाच येते आता येईल ती फक्त महायुतीची येईल आणि ५० हजाराचे मताधिक्याने येईल असे सांगतानाच जे घडले त्याचे आत्मपरीक्षण करुन पुन्हा एकदा जोमाने काम या शहरात करायचे आहे असे आवाहन सुनिल तटकरे यांनी केले.

या मतदारसंघातच नव्हे तर देशभरात ज्या पद्धतीने वातावरण गढूळ करण्यात आले होते असे असतानाही तटकरेसाहेब तुम्ही फार मोठया मताधिक्याने विजयी झालात त्याबद्दल मंत्री उदय सामंत यांनी खासदार सुनिल तटकरे यांचे अभिनंदन केले. जी जी विकासकामे तीन महिन्यात करायची आहे ती करण्याचे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिले.

ज्या चूका झाल्या आहेत त्या दुरुस्त करून पुढे जायचे आहे. त्यामुळे आता कोकणात फक्त महायुतीच हे दाखवून द्यायचे आहे असे आवाहन आमदार भरत गोगावले यांनी केले. आम्हाला जनतेचा विकास हवा आहे आम्हाला दुसरं काही नको… आम्ही सांगतो ती कामे सरकारकडून होत आहेत. आम्ही काम करतो म्हणून मी इथे बोलू शकतो असेही भरत गोगावले म्हणाले.

गेले दोन दिवस रायगड लोकसभा मतदारसंघातील पेण, अलिबाग, मुरुड, रोहा, तळा, माणगाव येथे आभार सभा मोठ्या उत्साहात पार पडल्यानंतर आज महाड शहरातही आभार सभा मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी महायुतीच्यावतीने खासदार सुनिल तटकरे यांचा सन्मान करण्यात आला.

या आभार सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, रायगड पालकमंत्री उदय सामंत, आमदार भरत गोगावले, शिवसेना तालुकाप्रमुख सुनिल महाडिक, भाजप तालुकाध्यक्ष जयवंत दळवी,भाजप नेते बिपीन महापुणकर, पद्मश्री डॉ. बावस्कर, डॉ. प्रभाकर जाधव, डॉ. चंद्रशेखर दाभाडकर, आदींसह महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.