Breaking News

“मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही…” ;पुण्यात ठाकरेंची तोफ धडाडली

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आज पुण्यात मेळावा झाला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही, तुमची तेवढी कुवत नाही, अशी बोचरी टीका केली आहे. “मी मुंबईच्या शिवसेनेच्या मेळाव्यात म्हणालो होतो. एक तर तू राहशील किंवा मी राहीन. काहीजणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं आहे. मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही. मी म्हणजे माझा संस्कारी महाराष्ट्र आणि तू म्हणले महाराष्ट्रावर दरोडेखोरांचा, पक्षावर दरोडे टाकणारा आहे. ढेकणाला आव्हान देत नाही, ढेकणं अंगठ्याने चिरडायची असतात,” असं ते म्हणाले.

ते म्हणाले की , त्यांना वाटलं मी त्यांनाच बोललोय. ते म्हणाले माझ्या नादाला लागू नका. तुमच्या नादाला लागण्याइतके तुम्ही कुवतीचे नाही, असा बोचरावार उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर केला. बरबादी करणारे सत्तेत राहूच शकत नाहीत. त्यांना सत्तेत बाहेर काढण्यासाठीच मी म्हणतो तू राहशील किंवा मी राहीन, असं देखील ठाकरे म्हणाले.

काँग्रेसकडे ७० वर्षांचा हिशोब मागता, पण एकाच वर्षात संसद गळत आहे, राम मंदिर गळत आहे. त्याचा हिशोब कोण देणार? हिंदूत्वाच्या वेडापायी मोदींना पाठिंबा दिला होता. तो अहमद शहा अब्दाली होता, हे अमित शहा आहेत. अब्दालीचे हे वशंज आहेत. मला हिंदूत्व शिकवता. नवाब मलिकांचे केक खाणारी औलाद तुमची आम्हाला काय हिंदुत्व शिकवता, असा घणाघात ठाकरे यांनी केला.

आमचा तुम्ही विश्वासघात केला. शंकराचार्य त्यामुळेच तुम्हाला विश्वासघाती म्हणतात. शिवरायांचा धर्म पुढे घेऊन जाणारं आमचं हिंदूत्व आहे. शिवराज आणि बाळासाहेब ठाकरे माझं प्रत्येक पाऊल पाहात आहेत. तुमचा सत्ताजिहाद सुरु आहे, अशी टीका त्यांनी केली. ठाकरेंनी लाडकी बहीण योजनेवर देखील टीका केली. लाच देऊन मत विकत घेण्याचा हा प्रकार आहे, असं ते म्हणाले.