महाविकास आघाडीचे परभणी लोकसभेचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंनी सभा घेतली. त्या सभेत त्यांनी मोदी आणि शाह यांच्यावर टीका केली. मी वादळात उभा राहणार आहे, संकटांना तोंड देणार आहे. येऊदे किती संकटं मी उभा ठाकलो आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी परभणीतल्या भाषणाला सुरुवात केली. उद्धव ठाकरे बोलत असताना पाऊस आला. त्या पावसातही त्यांनी भाषण केलं.
काय म्हणाले उद्धव ठाकरे ?
“माझ्या शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणजे ही परभणी आहे. माझ्यासमोर सगळे माझे मावळे बसले आहेत. मिंधे आणि भाजपा यांना वाटलं असेल की पैशांनी सगळं घेता येतं पण परभणीकर पैशांनी विकले जाऊ शकत नाहीत. आपली परीक्षा आहे. वादळला अंगावर घ्यायला मर्दाची छाती लागते ती आपल्याकडे आहे. पाठीवरुन आम्ही वार करत नाही.” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
“आपल्या गीतातून जय भवानी शब्द काढा हे सांगत आहेत. महाराष्ट्र मोदी आणि शाह यांना कान धरुन आणि जय भवानी जय शिवाजी म्हणत उठाबशा काढायला लावल्याशिवाय राहणार नाही. मोदी-शाह यांचा महाराष्ट्राबद्दल आकस आहे. उद्धव ठाकरेला संपवायचं आहे ना? बघा प्रयत्न करुन. पण महाराष्ट्राबद्दलचा राग असा काढता? दिल्लीत बसलेत म्हणजे सगळा देश यांची मनमानी सहन करेल का? प्रेमाने मिठी मारली तेव्हा आम्ही साथ दिली. पण आता पाठीत वार केला आहात तर माझी वाघनखं बाहेर आली आहेत. आम्ही काही सुधीर मुनगंटीवारांसारखी वाघनखं आणण्याची शोबाजी करत नाही.” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
“आपला महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा, साधू-संतांचा महाराष्ट्र आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या प्रचार सभेत बहिण भावाच्या नात्याबाबत बोलले ते सुसंस्कृत माणसाला खाली मान घालायला लावणारं आहे. त्यांना मोदींनी आधी काही गोष्टी शिकवाव्यात. तुम्ही उद्धव ठाकरेची शिवसेना नकली आहे म्हणता. तुमच्या आजूबाजूला जे टिनपाट लोक आहेत ते वाट्टेल ते बोलत आहेत. सुप्रिया सुळेंना चॅनलसमोर शिवी दिली पण मोदी-शाह काही बोलत नाहीत. महिलांचा अपमान केलात तरीही चालेल पण मतं द्या म्हणत आहेत. अशा लोकांना एकही मत मिळता कामा नये.” असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
“मोदी-शाह आपल्या घराणेशाहीबद्दल बोलत आहेत. मला माझ्या घराण्याबाबत अभिमान आहे. आज मोदींचं नाणं महाराष्ट्रात चालत नाही, त्यांचा चेहरा चालत नाही. त्यामुळे गद्दारांना बरोबर घेतलं आहे जे हिंदूहृदयसम्राटांचा चेहरा दाखवून तुमच्याकडे मतं मागत आहेत. मोदी जेव्हा घराणेशाहीवर बोलता तेव्हा आम्ही तुमच्या एकाधिकारशाहीवर बोलणारच. भाकड जनताचा नवा सिझन आलाय जुमला तीन. अॅक्टर तोच, खलनायक तोच, स्टोरी रायटर तोच. कितीवेळा तीच सीरिज बघायची? महाराष्ट्र आणि देश यांनी नासवून टाकला. ही मालिका आता बंद करा. ही मालिका पाहून कुणाचं पोट भरलेलं नाही. डोळ्यांदेखत महाराष्ट्र लुटत आहेत. जे महाराष्ट्राच्या हक्काचं आहे ते गुजरातला नेत आहेत. तरीही आपण गप्प बसायचं. ते होणार नाही. समोरच्याचं डिपॉझिट जप्त करुन आपल्याला जिंकायचं हे लक्षात ठेवा असंही उद्धव ठाकरे म्हणाले.