मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावोस दौरा चांगलाच चर्चिला जात आहे. लाखो कोटींचे एमओयू आणि हजारोंच्या संख्येने रोजगार उपलब्ध झाल्याचा दावा भाजपकडून केला जातोय. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राची औद्योगिक वाटचाल कशी जोरात सुरु आहे, हे देखील सांगितले जात आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्ष विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महायुती सरकार व भाजपवर तोंडसुख घेत हे सरकार महाराष्ट्रातील जनतेची कशी दिशाभूल करत आहे, याकडे लक्ष वेधले आहे. विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी दावोसमध्ये करार झालेल्या कंपन्यांची यादी सोशल मिडियावर शेअर केली आहे.
ज्या 28 कंपन्यांशी राज्य सरकारने उद्योगासाठी करार केले आहेत, त्यातील वीस या महाराष्ट्रातीलच असल्याचा दावा केला आहे. मग मुख्यमंत्र्यांचा दावोस दौरा कशासाठी? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. अंबादास दानवे यांनी दावोस आणि यामध्ये झालेल्या करारांची यादी देत ही आहे दावोसमध्ये महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करार झालेल्या कंपन्यांची यादी. यात एकूण 29 कंपन्या आहेत ज्यातील केवळ एक विदेशी उद्योग आहे.
उर्वरित 28 या हिंदुस्थानातील उद्योग आहेत. या 28 पैकी 20 तर महाराष्ट्रातील निघाल्याचे म्हटले आहे. अजून सांगतो, या 20 पैकी 15 मुंबई, 4 पुणे तर एक ठाण्यात आहेत! मग दावोस दौरा कशासाठी! माझे आवाहन आहे की गतवर्षी झालेल्या सामंजस्य करारातील किती करार आतापर्यंत अंमलात आले आहेत हे उद्योगमंत्री उदय सामंत आणि मुख्यमंत्री कार्यालय यांनी जाहीर सांगावं! हा आकडा 20-25 टक्क्यांपेक्षा अधिक नक्कीच नसणार, असा दावाही अंबादास दाने यांनी केला आहे.
तत्पुर्वी सकाळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही दावोसमध्ये झालेल्या कराराबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारवर टीका केली होती. पापड, लोणचे, चपात्या, उदबत्त्याच्या कंपन्यांसोबत झालेल्या करारांचे कौतुक काय सांगता? असा सवाल करत जर खरचं तुमच्या उद्योगातील करारांमधून 16 लाख जणांना रोजगार मिळणार असेल, तर आम्ही तुमचे स्वागत करु, असा टोला लगावला होता.