Breaking News

KBC 16 मध्ये, पानी फाऊंडेशनसाठी स्थानिक लोकांमध्ये मिसळता यावे म्हणून मराठी भाषा शिकल्याबद्दल आमीर खानचे अमिताभ बच्चन यांनी केले कौतुक

या शुक्रवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कौन बनेगा करोडपती मधल्या जल्लोषात अवश्य सामील व्हा, कारण त्या दिवशी ‘महानायक का जन्मोत्सव’ या विशेष भागात बॉलीवूडचा शहनशाह अमिताभ बच्चन यांचा 82 वा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. या आनंद सोहळ्यात भर घालण्यासाठी ‘परफेक्शनिस्ट’ आमीर खान आपला मुलगा जुनैद याच्यासह उपस्थित असणार आहे. श्री. बच्चन यांच्या भारतीय सिनेमातील योगदानाचा गौरव करून हे उपस्थित मान्यवर हा भाग संस्मरणीय करतील!

गप्पांच्या ओघात आमीर खानने पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून तो जे परोपकारी उपक्रम चालवतो, त्याची माहिती त्याने दिली. महाराष्ट्रातील पाणी टंचाईच्या समस्येवर ही संस्था अविरत कार्य करत आहे. मराठी ही काही आमीर खानची मातृभाषा नाही, पण संस्थेचे काम करताना खेड्या-पाड्यातील लोकांशी त्यांच्या भाषेत संवाद साधता यावा, त्यांच्याशी जवळीक साधता यावी म्हणून मराठी भाषा शिकण्याचा त्याने जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे, हे श्री. बच्चन यांनी ओळखले.

समाज कल्याणासाठी आणि मराठी भाषा शिकण्यासाठी आमीर खान करत असलेल्या प्रयत्नांना दाद देताना अमिताभ बच्चन म्हणाले, “गावातल्या लोकांशी सहज संवाद साधता यावा म्हणून मराठी भाषा शिकण्यासाठी तू जे प्रयत्न केलेस, ते मी पाहिले आहेत. तुला मराठी बोलताना देखील मी पाहिले आहे. मला तुझा हेवा वाटतो कारण मी सुद्धा ही भाषा शिकण्याचा बऱ्याच काळापासून प्रयत्न करत आहे, पण अजून मला ती हवी तशी जमलेली नाही.”

कार्यक्रमात पुढे आमीर खानने त्याच्यासोबत एका गावात येण्यासाठी अमिताभ बच्चन यांना आमंत्रण दिले. तो म्हणाला, “गावकरी तुम्हाला भेटून फारच खुश होतील! आणि तुमच्यासाठी देखील तो एक वेगळा अनुभव असेल.” बिग बींनी आनंदाने ते आमंत्रण स्वीकारले.

बघायला विसरू नका, ‘महानायक का जन्मोत्सव’ या शुक्रवारी 11 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजता कौन बनेगा करोडपती- सीझन 16 मध्ये फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!