kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

इंडियाज बेस्ट डान्सर 4 साठी पुन्हा एकदा अभिनेता जय भानुशाली होस्टच्या रुपात दिसणार आणि यावेळी सोबत गेल्या वेळेसचा स्पर्धक अनिकेत चौहान असणार!

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनने अलीकडेच ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या लोकप्रिय डान्स रियालिटी शोच्या नवीन सीझनची घोषणा केली आहे. आपल्या चौथ्या सीझनमध्ये हा शो प्रेक्षकांना ‘जब दिल करे डान्स कर’ असा सोपा मंत्र देत आहे. डान्सची ताकद आणि डान्समुळे जाग्या होणाऱ्या भावना व तणाव दूर करण्याची क्षमता या मंत्रातून व्यक्त झाली आहे. यावेळी परीक्षकांच्या पॅनलवर गीता कपूर आणि टेरेन्स लुईस या पूर्वीच्या परीक्षकांसोबत करिश्मा कपूर असणार आहे. शो च्या सूत्रसंचालनाची जबाबदारी पुन्हा जय भानुशाली निभावणार आहे. मात्र, यावेळी त्याच्या जोडीला अनिकेत चौहान असेल, ज्याने आपल्या अद्भुत डान्सिंग कौशल्याच्या बळावर मागच्या सीझनमध्ये सर्वांकडून खूप कौतुक मिळवून टॉप 5 मध्ये स्थान पटकावले होते.

जय एक कसलेला होस्ट आहे. आपल्या हलक्या-फुलक्या विनोदाने आणि गंमतीशीर स्वभावाने तो सगळ्यांना खिळवून ठेवतो. या सीझनमध्ये तो अनिकेतला सूत्रसंचालनाचे धडे देताना दिसेल आणि ते दोघे मिळून या शोच्या रंजकतेमध्ये नक्कीच भर घालतील. गेल्या सत्रातील एक विनम्र स्पर्धक अनिकेत यावेळी होस्टच्या रुपात प्रेक्षकांसमोर येऊन आपल्या गोड आणि सरळ स्वभावाने तुमचे मन जिंकून घेईल. स्पर्धक आणि परीक्षकांसोबत जय आणि अनिकेतची जोडी हे सत्र अविस्मरणीय करण्यासाठी सज्ज आहेत.

लिंक: https://www.instagram.com/reel/C86ghjUK0jr/?igsh=MWVlN2JscXkxdHVmNQ==

आपल्या पुनरागमनाविषयी जय भानुशाली म्हणतो, “इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 4 साठी होस्ट म्हणून परतताना मला खूप आनंद होत आहे. गीता मा आणि टेरेन्सशी माझे नाते मस्त आहे. करिश्मा कपूरचा तर मी पहिल्यापासून चाहता आहे. त्यामुळे या सत्राचे सूत्रसंचालन करण्यासाठी मी विशेष उत्सुक आहे. या शोच्या मागच्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून आलेल्या अनिकेतसोबत यावेळी मस्ती करण्यासाठी मी आतुर आहे.”

आपला उत्साह न लपवता अनिकेत चौहान म्हणाला, “या शो मध्ये सह-सूत्र संचालक म्हणून परतताना मला स्वप्न साकार झाल्यासारखे वाटते आहे. या शोमधले अप्रतिम परीक्षक, जय भैया आणि नव्या दमाचे स्पर्धक यांच्या सोबत हा मंच शेअर करण्याची उत्सुकता माझ्या मनात आहे. यापूर्वी मी कधीच होस्ट म्हणून काम केलेले नाही, पण हा नवीन अनुभव घेण्यासाठी आणि खास म्हणजे जयकडून या कलेतल्या युक्त्या शिकण्यासाठी मी आतुर आहे.”

‘इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 4’ सुरू होत आहे, 13 जुलैपासून आणि दर शनिवारी आणि रविवारी रात्री 8 वाजता त्याचे प्रसारण करण्यात येईल, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरून!