भारतातली लोकशाही संपवण्याचा प्रयत्न इंदिरा गांधींनी केला होता, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. इंदिरा गांधींनी विरोधी पक्षांच्या लाखो नेते-कार्यकर्त्यांना दोन वर्षांपर्यंत तुरुंगात ठेवले. त्यानंतरही त्यांना भारतातली लोकशाही संपवता आली नाही. लोकशाही कुणीच संपवू शकत नाही, असेही ते म्हणाले. भाजपच्या जाहीरनाम्याची माहिती देण्यासाठी सोमवारी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी काँग्रेसचा समाचार घेतला.

ते म्हणाले, गेल्या १० वर्षांपासून मोदींकडे पूर्ण बहुमत आहे. पण, त्यांनी संविधान बदलण्याचा विचारही केला नाही. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले आहे की, संविधानाची मूलभूत रचना बदलण्याचा अधिकार संसदेलाही नाही. त्यामुळे काँग्रेस जनतेमध्ये खोटा प्रचार करीत आहे. काँग्रेसला जेव्हा विकास, जनहिताचे काम करता येत नाही, विश्वासार्हता संपलेली असते तेव्हा लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, असेही फडणवीस म्हणाले.

भाजपचा जाहीरनामा हा रोजगाराच्या संधी निर्माण करणारा असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. नवउद्योग, कारखाने, कृषी, सहकार अशा सर्वच क्षेत्रात वाढ होणार असून यामुळे रोजगाराचीही निर्मिती होईल. तसेच शासकीय सेवांमधील जागाही भरण्यात येतील, असेही फडणवीस म्हणाले.

मी मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदा ओबीसी मंत्रालय तयार केले. मोदी सरकारमध्ये ६० मंत्री ओबीसी आहेत. ओबीसींच्या ३० योजना आमच्या काळात पूर्ण झाल्या. त्यामुळे काँग्रेसला ओबीसींवर बोलण्याचा अधिकार नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली.