शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. महायुतीच्या वचननाम्यामध्ये जी – जी आश्वासने महाराष्ट्रातील बळीराजाला देण्यात आली ती पूर्ण करण्याची नैतिक जबाबदारी महायुतीची आहे परंतु कालपासून खोडसाळपणे प्रसारमाध्यमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा कर्जमाफीला विरोध आहे अशाप्रकारची चर्चा होत असून हे अत्यंत चुकीचे असल्याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केला आहे आहे.
गेले दहा दिवस अजित पवार हे राज्याचे अर्थ व वित्त नियोजन मंत्री म्हणून प्रत्येक खात्याच्या मंत्र्यांसोबत, राज्यमंत्र्यांसोबत, सचिव, उपसचिव यांच्याशी बैठका घेऊन चर्चा करत आहेत. ज्यावेळी अजित पवार मार्चमध्ये राज्याचा अर्थसंकल्प मांडतील त्यावेळी पुढच्या वर्षीचा फायनान्सियल आऊटलेट काय असला पाहिजे. सन २४-२५ या मागील वर्षात झालेल्या घोषणा आणि त्याबाबत झालेले खर्चाचे नियोजन त्यात अधिक खर्च झालेला नाही याचा अत्यंत सूक्ष्मपणे प्रत्येक खात्याचा आढावा घेत आहेत असेही आनंद परांजपे यांनी स्पष्ट केले.
मार्चमध्ये जेव्हा राज्याचा अर्थसंकल्प सादर होईल त्यावेळी महायुतीने आपल्या वचननाम्यामध्ये केलेल्या सर्व घोषणा पूर्ण झालेल्या पहायला मिळतील. बळीराजा हा कायम राष्ट्रवादी काँग्रेसच्या विकासाचा केंद्रबिंदू राहिलेला आहे. त्यामुळे कुठेही शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार नाही अशाप्रकारच्या बातम्या माध्यमप्रतिनिधिंनी चालवू नये असा सल्लाही आनंद परांजपे यांनी दिला आहे.
यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या इतर अनेक प्रश्नांना आनंद परांजपे यांनी उत्तरे दिली.