Breaking News

काँग्रेसकडून कन्हैया कुमारला लोकसभेची उमेदवारी ;आता लढत होणार भाजप नेते मनोज तिवारी यांच्याशी !

काँग्रेस पक्षाने कन्हैया कुमारला लोकसभेची उमेदवारी दिली आहे. राजधानी दिल्लीतील उत्तर पूर्वमधून कन्हैया कुमारला काँग्रेसने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे कन्हैया कुमारची लढत भाजप नेते, विद्यमान खासदार मनोज तिवारी यांच्याशी होणार आहे. देशाची राजधानी दिल्लीत इंडिया आघाडीत एकत्रित निवडणूक लढविणारे काँग्रेस पक्ष ३ तर आम आदमी पक्ष ४ जागांवर निवडणूक लढवत आहे. रविवारी रात्री काँग्रेस पक्षाने दिल्लीतील ३ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. चांदनी चौकमधून जेपी अग्रवाल, उत्तर पश्चिममधून उदित राज तर उत्तर पूर्वमधून कन्हैया कुमारला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आहे.

गत लोकसभा निवडणुकीत कन्हैया कुमार सीपीआयकडून बिहारमधील बेगुसराय मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढला होता. त्या निवडणुकीत कन्हैयाचा सुमारे ३ लाखांहून अधिक मतांनी पराभव झाला होता. निवडणुकीनंतर कन्हैयाने काँग्रेस पक्षात प्रवेश करून राहुल गांधी यांच्यासोबतीने भारत भ्रमंती केली. राहुल यांच्या भारत जोडो यात्रेत कन्हैयाचा महत्त्वाचा सहभाग होता. यात्रेच्या रणनीतीपासून सभांच्या आखणीचे काम कन्हैयाने सांभाळले. गेल्या दोन-अडीच वर्षात कन्हैयाने काँग्रेसचा विचार आपल्या भाषणांतून देशभरात संधी मिळेल तिथे मांडला. याचेच फळ आजच्या उमेदवारीतून काँग्रेसने कन्हैयाने दिल्याचे बोलले जाते.

एकीकडे राहुल गांधी यांच्या ‘यंड ब्रिगेड’मधील सगळे महत्त्वाचे नेते भाजपच्या वळचणीला गेलले असताना लोकसभेत त्यांच्या संगतीला तरुण तुर्क आक्रमक नेता असावा या उद्देशाने काँग्रेसने कन्हैयाला दिल्लीतून उमेदवारी दिली आहे. अभिनेते, भाजप नेते मनोज तिवारी यांच्याशी कन्हैया दोन हात करेल. या लढतीकडे देशाचे लक्ष असेल.