kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

सत्य घटनेवर आधारित ‘करेज’ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे – अभिनेत्री संस्कृती बालगुडे

मराठी चित्रपटकर्मींना जागतिक चित्रपट उद्योगाशी जोडण्यात ’करेज’ या चित्रपटाने निश्चितच पुढचे पाऊल टाकले आहे. जे आपल्या मराठी चित्रपटांना प्रेरणा देईल. असा विश्वास अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांनी व्यक्त केला.
’करेज’ चित्रपटातील केंद्रीय भूमिका करणाऱ्या अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांचा विशेष सन्मान अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने करण्यात आला. याप्रसंगी लेखक समीक्षक राज काझी यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत त्या बोलत होत्या. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले हे यावेळी मंचावर उपस्थित होते. 

हॉलिवूडच नव्हे तर जगात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या ’वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओज’मध्ये ’करेज’ या चित्रपटाचा लॉस एंजेलिस येथे एका खास शो नुकताच पार पडला. चित्रपट इंगजी असला तरी निर्माते, लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार मराठी असल्याने याचा प्रातिनिधिक सन्मान म्हणून महामंडळातर्फे या संवादाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रत्येकाच्या आयुष्यात दुख: असते आणि प्रत्येकाचे वेगळे असते आपण त्याला  कसे सामोरे जातो हे अत्यंत महत्वाचे असते, असे भान या चित्रपटाने दिले असे नमूद करत एक चांगली कलाकृती, वेगळा सामाजिक संदेश देणारा आणि सत्य घटनेवर आधारित असणारा ‘करेज’ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे असे आवाहन अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांनी केले. 

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, मराठी माणसांनी इंग्रजीत केलेल्या या चित्रपटांचे जगभर कौतुक होत आहे. सध्या हा चित्रपट जगभरातील विविध फिल्म फेस्टिव्हल मध्ये प्रदर्शित केला जात आहे. चित्रपटाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हा एक सामाजिक विषय असला तरी यात एक ह्रदयास्पर्शी प्रेमकथा दडलेली आहे. राजराणी शर्मा  यांनी पतीला किडनी देताना केलेला संघर्षमय प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. 

मेघराज राजेभोसले म्हणाले, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ सातत्याने नवनवीन संकल्पना राबवत असते, काही नवीन करू पाहणाऱ्या चित्रकर्मीच्या पाठीशी उभे राहते आणि त्यांना प्रोत्साहन देत असते. आम्हाला अभिमान आहे की ‘करेज’ या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलावंत आणि तंत्रज्ञ यांनी एक जागतिक दर्जाचा चित्रपट निर्माण केला आहे. संस्कृती बालगुडे या आपल्या पुण्यातील आहेत, महामंडळाशी संलग्न आहे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचे कौतुक करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे आयोजन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *