kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

‘इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 4’ मधल्या आपल्या परीक्षक या भूमिकेविषयी सांगत आहे करिश्मा कपूर

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ने डान्स रियालिटी शोचा एक नवीन मापदंड तयार केला आहे. हा शो असामान्य कलाकारांना त्यांची प्रतिभा या भव्य मंचावर सादर करण्यासाठी आमंत्रित करतो. असामान्य प्रतिभा आणि जबरदस्त डान्स मूव्ह्जचा वेधक प्रवास दाखवण्याची हमी देणारा हा चौथा सीझन प्रेक्षकांना ‘जब दिल करे डान्स करे’ अशी विनवणी करतो. या सत्रात ग्लॅमरची चमक वाढवण्यासाठी बॉलीवूड सुंदरी करिश्मा कपूर परीक्षक म्हणून या कार्यक्रमात दाखल होत आहे. तिच्या सोबत, मागच्या सत्रात देखील परीक्षणाचे काम करणारे टेरेन्स लुईस आणि गीता कपूर तर आहेतच. या शो मध्ये परीक्षण करताना एन्टरटेन्मेंट स्पेशलिस्ट म्हणून आपली काय भूमिका असेल, याबद्दल सांगत आहे करिश्मा कपूर.

1.प्रेक्षक पहिल्यांदाच तुला एका फुल-टाइम परीक्षकाच्या रूपात बघणार आहेत. या शो साठी होकार देण्यामागचे कारण काय होते?

गेल्या काही वर्षांत अनेक डान्स रियालिटी शोज मध्ये मी हाजरी लावली आहे. त्यावेळी मी एखाद्या खास भागात सहभागी असायचे, ज्यात मला खूप मजाही यायची. पण मला वाटायचे, फुल-टाइम परीक्षक म्हणून काम करणे ही खूप मोठी जबाबदारी आणि वचनबद्धता आहे. पण इंडियाज बेस्ट डान्सरची गोष्टच वेगळी आहे. या शो च्या मागच्या सत्रात एका भागात मी विशेष परीक्षक म्हणून आले आहे. त्यावेळी या शो ची ऊर्जा आणि इथले एकंदर उत्साही वातावरण यांनी मी भारून गेले होते. या शो मध्ये परीक्षक म्हणून काम करण्याचे स्वीकारण्यामागे हे एक मोठे कारण होते. शिवाय, इंडियाज बेस्ट डान्सर या शो च्या माध्यमातून नवीन, युवा प्रतिभावान डान्सरची प्रगती बघण्यास मी उत्सुक आहे, कारण त्यात माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळाची आठवण आणि विविध डान्स प्रकार शिकण्याचे माझे प्रयत्न यांची आठवणही सामील आहे. माझ्या कारकिर्दीतला डान्सचा प्रवास फार सुंदर होता आणि मला तो फार प्रिय आहे. या शो मध्ये ज्या प्रतिभेचे दर्शन घडते, ते पाहून मी चकित होते. आमच्या शो मधल्या या प्रतिभावान स्पर्धकांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतील, अशी मला आशा आहे.

  1. परीक्षक म्हणून तुझा निकष काय असेल?

या सीझनमधली एक परीक्षक म्हणून डान्स शैलीत होत असलेले बदल आणि स्पर्धकांची अपरिमित सर्जनशीलता बघताना मी थरारून जाते. हा मंच केवळ स्पर्धकांच्या प्रतिभेचा गौरवच करत नाही, तर त्यांच्यात इनोव्हेशन आणि चिकाटी या गुणांचे सिंचन देखील करतो. टेरेन्स आणि गीतासोबत हा रोमांचक प्रवास करण्यास मी आतुर आहे. स्पर्धकांना प्रेरित, सक्षम आणि प्रोत्साहित करून त्यांच्या परफॉर्मन्स नव्या उंचीवर घेऊन जाणे हा आम्हा परीक्षकांचा उद्देश आहे.

  1. गीता कपूर आणि टेरेन्स लुईस या साथीदार परीक्षकांशी तुझे नाते कसे आहे?

गीता आणि टेरेन्स सोबत परीक्षकांच्या पॅनलवर काम करताना खूप मजा येते आणि शिकायलाही मिळते. मी अनेक वर्षांपासून या दोघांना व्यक्तिशः ओळखत आहे. गीतासोबत तर मी काम देखील केले आहे. त्यांच्या सोबत काम करण्याचा अनुभव छान आहे, कारण ते केवळ डान्स क्षेत्रातील तज्ज्ञच नाहीत, तर आपल्या अस्तित्वाने आणि टिप्पण्यांनी ते कार्यक्रमास अधिक रंजक आणि मजेदार बनवत असतात, जे मला फार आवडते.

  1. या शो च्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना तू काय संदेश देशील?

आपल्या चौथ्या सत्रात इंडियाज बेस्ट डान्सर ज्या प्रतिभावंतांना घेऊन येत आहे, त्यांची गुणवत्ता अफाट आहे. आपली ऊर्जा आणि जोम यांच्या बळावर ते प्रेक्षकांचे मन नक्कीच काबिज करतील. टक्कर काट्याची आहे आणि मला आशा आहे की, प्रेक्षक या कार्यक्रमावर आपल्या प्रेमाचा वर्षाव करत राहतील, कारण त्यांच्या आजवरच्या प्रेमापोटीच आम्ही हा चौथा सीझन घेऊन आलो आहोत.