लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानास आज प्रारंभ झाला. देशभरातील १०२ जागांवर मतदानाला सुरुवात झाली. त्यात महाराष्ट्रातील पाच जागांचा समावेश आहे. राज्यातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या जागांवर मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात ८ केंद्रीय मंत्र्यांच्या जागांचा समावेश आहे. मोदी सरकारमधील मंत्री नितिन गडकरी, किरेन रिजिजू, सर्बानंद सोनोवाल, संजीव बालियान, जितेंद्र सिंह, भूपेन्द्र यादव, अर्जुन राम मेघवाल आणि एल मुरुगन यांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. तसेच दोन माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब (त्रिपुरा) आणि नबाम तुकी (अरुणाचल प्रदेश) यांच्या जागेवर मतदान होत आहे. भाजप आणि काँग्रेससाठी हा टप्पा अतिशय महत्वाचा आहे.

मतदान होणाऱ्या बड्या नेत्यांमध्ये नितीन गडकरी (नागपूर), के अन्नामलाई (कोयंबटूर), जितिन प्रसाद (पीलीभीत), जीतन राम मांझी (गया), नकुल नाथ (छिंदवाड़ा), गौरव गोगोई (जोरहाट), इमरान मसूद (सहारनपुर), कार्ति चिदम्बरम (शिवगंगा), तमिलिसाई साउंडराजन (चेन्नई दक्षिण), दयानिधि मारन (चेन्नई सेंट्रल), अर्जुनराम मेघवाल (बीकानेर), भूपेंद्र यादव (अलवर सीट), संजीव बालियान (मुजफ्फरनगर), किरेन रिजिजू (अरुणाचल पश्चिम-अरुणाचल प्रदेश), निसिथ प्रमाणिक (कूचबिहार) यांचा समावेश आहे.

पहिल्या टप्प्यात ईशान्येकडील सहा राज्ये आहेत. या ठिकाणी लोकसभेच्या ९ जागा आहेत. दक्षिण भारतातील तामिळनाडूमध्ये सर्व ३९ जागा आहेत. लक्षद्वीपमध्ये १ जागा आहे. अरुणाचल प्रदेशमधून २, बिहारमधून ४, आसाममधून ४, छत्तीसगडमधून १, मध्य प्रदेशातून ६, महाराष्ट्रातून ५, मणिपूरमधून २, मेघालयातून २, मिझोराममधून १, नागालँडमधून १, राजस्थानमधून १२, सिक्कीममधून १, त्रिपुराच्या १, उत्तर प्रदेशच्या ८, उत्तराखंडच्या ५, पश्चिम बंगालच्या ३, तामिळनाडूच्या ३९, अंदमान आणि निकोबारच्या १, जम्मू-काश्मीरच्या १, लक्षद्वीपच्या १ आणि पुद्दुचेरीच्या १ जागेवर मतदान होत आहे.