महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुणे शहर आणि जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांत निवडणूक लढविण्याची तयारी पूर्ण केली असून, याबाबत आज, सोमवारी पुन्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत चर्चा होणार आहे. या चर्चेनंतर मनसेकडून काही नावांची घोषणाही होऊ शकते. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील इतर पक्षातील काही नाराज उमेदवार मनसेकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे रल्वे इंजिन रंगतदार करणार असल्याचे चित्र आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे शहर आणि जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. या वेळी मनसेच्या पुण्यातील १० पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. ठाकरे यांनी विधानसभानिहाय प्रत्येकाशी वैयक्तिक चर्चा करून उमेदवारांची चाचपणी केली. काही मतदारसंघासाठी इतर पक्षातील नाराज उमेदवारांच्या नावांचीही चर्चा करण्यात आली आहे. ही चर्चा बराच काळ चालल्यामुळे अंतिम निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज, सोमवारी पुन्हा मुंबईत बैठक होणार आहे. त्यानंतर काही मतदारसंघांसाठी उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे.