Breaking News

खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा केले वादग्रस्त वक्तव्य ; संसदेत मोठा गदारोळ

AIMIM चे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभेत शपथ घेतल्यानंतर मंगळवारी मोठा गदारोळ झाला. ओवेसी यांनी शपथ घेऊन झाल्यानंतर ‘जय पॅलेस्टाईन’चा नारा दिला. ज्यावर इतर सदस्यांनी आक्षेप घेतला होता. गोंधळ झाल्यानंतर राधामोहन सिंह यांनी हा शब्द कामकाजातून काढून टाकण्याचे आदेश दिले. ओवेसी यांच्या या घोषणेला भाजप नेते जी किशन रेड्डी यांनी विरोध केला आणि ते रेकॉर्डमधून काढून टाकण्याची मागणीही केली. विरोध झाल्यानंतर ओवेसी म्हणाले की, ते (जी किशन रेड्डी) विरोध करतात, हे त्यांचे काम आहे. मला जे म्हणायचे होते ते आम्ही बोललो. त्यांना खूश करण्यासाठी मी काही का बोलू?

ओवेसी यांनी शपथ घेतल्यानंतर ‘जय भीम, जय मीम, जय तेलंगणा, जय पॅलेस्टाईन…’ असा नारा दिला. यावर खासदार शोभा करंदलाजे यांनी प्रश्न उपस्थित केला. यानंतर संसदेतील इतर सदस्यांनीही जय पॅलेस्टाईनबाबत आक्षेप घेतला होता. यावरुन वाद वाढत चालला असताना राधामोहन सिंह यांनी तो रेकॉर्डमधून काढून टाकण्याचे आदेश दिले.

जी किशन रेड्डी म्हणाले की, एकीकडे संविधानाबद्दल बोलयाचे आणि दुसरीकडे संविधानाच्या विरोधात घोषणा द्यायच्या. भारतात राहून पॅलेस्टाईनची गाणी गाणे हे चुकीचे आहे. अशा घटनांमुळे या लोकांचा खरा चेहरा समोर आलाय. हे लोक नेहमीच प्रत्येक विषयावर असे प्रकार करतात.’

ओवेसी यांनी उर्दूमध्ये खासदारकीची शपथ घेतली. त्यांचं नाव जेव्हा शपथ घेण्यासाठी पुकारण्यात आलं. तेव्हा काही खासदारांनी भारत माता की जय चा नारा दिला. तर काही खासदारांनी जय श्री रामच्या घोषणाही दिल्या. ओवेसी शपथ घेण्यासाठी व्यासपीठावर पोहोचले तेव्हा त्यांनी सर्वप्रथम जय भीमचा नारा दिला. यानंतर त्यांनी उर्दूमध्ये शपथ घेतली. यानंतर पुन्हा जय भीम, जय मीम, जय तेलंगणा, जय पॅलेस्टाईनच्या घोषणा दिल्या.

हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून असदुद्दीन ओवेसी सलग पाचव्यांदा विजयी झाले आहेत. यावेळी असदुद्दीन ओवेसी यांना एकूण 6,61,981 मते मिळाली आणि त्यांनी भाजपच्या माधवी लता यांचा 3,38,087 मतांनी पराभव केला. 2019 च्या निवडणुकीत, ओवेसी यांनी एकूण 58.95% मतांसह विजय मिळवला होता.