kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

माझ्या वाढदिवसानिमित्ताने कुणीही फ्लेक्स, होर्डिंग्ज लावू नका ; सुप्रिया सुळेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

येत्या ३० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वरिष्ठ नेत्या तथा लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा ५५ वा वाढदिवस आहे.मात्र यंदा कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी कुठेही फ्लेक्स होर्डिंग्स न लावता शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी विधायक कार्यक्रमांचं आयोजन करावं, असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. खासदार सुळे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मसह इतर समाजमाध्यमांवर पोस्ट करून त्यांचा निरोप कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवला आहे.

काय आहे सुप्रिया सुळे यांची पोस्ट ?

सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे, सप्रेम नमस्कार, गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्याने राज्यात दुष्काळाची स्थिती आहे. अनेक ठिकाणी तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तर अनेक ठिकाणी चाऱ्याच्या टंचाईमुळे पशुधन जगवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. ही कठिण परिस्थिती पाहता माझे आपले कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतक सर्वांना नम्र आवाहन आहे की येत्या ३० जून रोजी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुणीही फ्लेक्स, होर्डिंग्ज आदी लावू नयेत. तसेच विविध माध्यमातून जाहिराती करणे टाळावं. त्याऐवजी आपण सर्वांनी दुष्काळी परिस्थितीमुळे त्रस्त असणाऱ्या शेतकरी, कष्टकरी घटकांना, शालेय विद्यार्थ्यांना आणि गरजूंना मदत होईल अशा पद्धतीचे विधायक कार्यक्रम करावे.

आपणा सर्वांना तुमच्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहोचवण्याची इच्छा असते. अनेकांना मला भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि भेटवस्तू द्यायच्या असतात. पण यापेक्षा आपण दुष्काळग्रस्त बांधवांसाठी काही करु शकलात तर याच माझ्यासाठी सर्वात मोठ्या शुभेच्छा असतील. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा सदैव माझ्यासोबत आहेत, याची मला जाणीव आहे, धन्यवाद.