विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असून त्यांचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा आहे. मात्र मुख्यमंत्री होणार याबाबत चर्चा अद्याप सुरु आहे. याशिवाय कुणाला मंत्रिपदाची संधी मिळणार याच्याच्या चर्चा आता जोरदार रंगू लागल्या आहेत. अशातच शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आमदार बालाजी किणीकर यांना मंत्रिपद मिळण्याचे संकेत दिले आहेत.
आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी अंबरनाथमधून सलग चार टर्म निवडून येण्याचा विक्रम केला आहे. त्यांचं काम आणि त्यांची मेहनत पाहून मुख्यमंत्री महोदय नक्कीच त्यांचा विचार करतील, असं म्हणत यंदा बालाजी किणीकर यांना मंत्रिपद मिळण्याचे संकेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले आहेत.
बालाजी किणीकर यांचा निवडणुकीत विजय झाल्यानंतर सायंकाळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी अंबरनाथमध्ये येऊन किणीकर यांचं अभिनंदन केलं. यावेळी किणीकर यांनी सलग चार वेळा निवडून येत विक्रम केला आहे, अशी प्रतिक्रिया श्रीकांत शिंदे यांनी दिली.
तसेच त्यांना आता तरी मंत्रिपद मिळणार का? असं श्रीकांत शिंदे यांना विचारलं असता, या सगळ्या गोष्टीचा निर्णय मुख्यमंत्री महोदय घेत असतात. असं म्हणत किणीकर यांनी चार टर्म केलेलं काम पाहून मुख्यमंत्री महोदय नक्कीच त्यांचा विचार करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे यंदा अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे.